

सांगली; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याबद्दल दत्ता लक्ष्मण ढवारे (वय 30, रा. कोल्हापूर चाळ, मिरज, मूळ गाव ढोकी, उस्मानाबाद) याला 10 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी सुनावली.
न्यायालयाने त्याला भा.द.वि.स. कलम 376 (2) (आय) (एन) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम 6 प्रमाणे दोषी ठरवून शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 5 वर्षे जादा सक्तमजुरीची शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सरकापक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे – साटविलकर यांनी काम पाहिले.सरकार पक्षाला हवालदार रमा डांगे, वंदना मिसाळ, सहाय्यक फौजदार शरद राडे, दीपा सूर्यवंशी, गणेश वाघ, महात्मा गांधी पोलिस ठाणे येथील अमोल पाटील, प्रल्हाद खोत यांनी मदत
केली.
खटल्याची पार्श्वभूमी अशी : आरोपी ढवारे हा कामानिमित्त त्याच्या मूळ गावाहून मिरजेत राहण्यास आला होता. त्याने पीडित मुलीला रेल्वे शेडजवळ नेऊन तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती राहिली. पीडित मुलीच्या घरच्या लोकांना शंका आल्याने त्यांनी तिला विचारले असता तिने ढवारे याने बलात्कार केल्याची माहिती दिली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने आरोपीविरुद्ध महात्मा गांधी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक सुनीता साळुंखे यांनी तपास करून ढवारे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल
केले. पीडितेचा कायदेशीररित्या गर्भपात करण्यात आला. डीएनएसाठी आरोपीचे, पीडित मुलगी व बाळाचे सॅम्पल घेण्यात आले व तपासणीसाठी पुणे येथे प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले होते. सरकार पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी व तिच्या आईचा जबाब, वैद्यकीय पुरावा, त्याचबरोबर न्यायवैज्ञानिक यांचा अहवाल ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली.