

सांगली; पुढारी वृत्तसेवा : आजचा रविवार शेतकर्यांनी दैनिक 'पुढारी' आयोजित कृषी प्रदर्शन पाहण्यासाठीच जणू राखीव ठेवला होता. प्रदर्शन पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी आज प्रचंड गर्दी झाली होती. सांगलीसह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्यांनीही आज आपला मित्रपरिवार आणि कुटुंबीयांना घेऊन प्रदर्शनाला भेट दिली. विविध स्टॉल्स गर्दीने भरुन गेले होते. दरम्यान, मंगळवार, दि. 7 मार्च रोजी प्रदर्शनाचा समारोप होत आहे.
दैनिक 'पुढारी' माध्यम समूह व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग सांगली यांच्यातर्फे पुढारी अॅग्रीपंढरी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सांगलीत विजयनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयामागील जिल्हा कृषी विभागाच्या भव्य मैदानावर हे प्रदर्शन सुरू आहे. ऑरबीट क्रॉप मायक्रोन्युट्रियंटस् हे मुख्य प्रायोजक तर रॉनिक स्मार्ट आणि आरसीएफ हे प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हे या प्रदर्शनाचे हेल्थ प्रायोजक आहेत.
पहिल्या दिवसापासूनच या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. नव्या पिढीतील शेतकरी अगदी उत्साहाने या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान जाणून घ्यायची त्यांची उत्सुकता मोठी आहे. य ठिकाणी मांडण्यात आलेल्या विविध कंपन्यांच्या स्टॉल्स्ना भेटी देऊन तरुण शेतकरी नवनवीन तंत्राची माहिती घेत आहेत. यासाठीची गर्दी मोठी आहे.
शेतीसाठी विविध तंत्र निर्माण करणार्या विविध कंपन्या आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून दैनिक पुढारी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरत असल्याची भावना अनेक शेतकर्यांनी आज व्यक्त केली.
चाळीस एकरहून जास्त जागेवर सुरू असलेल्या या प्रदर्शनामध्ये देश-परदेशातील तीसपेक्षा अधिक पिकांची प्रत्यक्ष लागवड केलेले प्लॉटस् आहेत. पीक लागवडीचे हे प्रात्यक्षिक शेतकर्यांना पाहायला मिळत आहे. यातून नवनवीन भरघोस उत्पादन देणारी विविध पिके, संकरित वाण, भाजीपाला, फुलवर्गीय पिके, विदेशी भाजीपाला यांची माहिती शेतकर्यांना प्रत्यक्ष पीक समोर असतानाच मिळत आहे. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. प्लॉटवर बहरलेली ही पिके पाहून शेतकर्यांना त्याच्या भरघोस उत्पादनाबाबतची खात्री पटत आहे. शिवाय सार्या प्रश्नांची उत्तरेही जाग्यावरच मिळत असल्याने हे प्रदर्शन आमच्यासाठी खूप वेगळा अनुभव असल्याचीही भावना शेतकर्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, शेतात पिके कोणती घ्यावीत, खते कोणती, बियाणे आणि पिकांच्या जाती – वाण कोणते, त्याचे उत्पादन कसे जास्त घ्यावे याचेही मार्गदर्शन या प्रात्यक्षिकांमधून शेतकर्यांना मिळते आहे. दरम्यान, प्रदर्शनात सिनर्जी मोफत हेल्थ चेकअपचा असंख्य शेतकर्यांनी लाभ घेतला. या प्रदर्शनात ठिबक सिंचन, तुषार सिंचन, धान्य निवड यंत्रे, अत्याधुनिक कृषी अवजारे, मल्चिंग पेपर, शेडनेट, पाईप यासह खते, बी- बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके, सेंद्रिय उत्पादने, सोलर पंप, मोटार पंप यांचे स्टॉल्सही गर्दीने भरुन गेले आहेत. ट्रॅक्टर – अवजारे यांची प्रात्यक्षिके पाहता येत आहेत. हाही वेगळा अनुभव शेतकर्यांना मिळत आहे. या प्रदर्शनात दोनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग आहे. पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन, कुक्कुटपालन कसे करावे, त्यात येणार्या अडचणी आणि उपाय तसेच कुक्कुटपालन, हॅचरीजपासून ते पोल्ट्री व्यवसायापर्यंत सर्व ती माहिती इथल्या स्टॉल्सवर मिळत आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत प्रदर्शनासाठी मोठी गर्दी होती.