सांगली; पुढारी वृत्तसेवा : दैनिक 'पुढारी' माध्यम समूह व महाराष्ट्र राज्य कृषी विभाग सांगली यांच्यातर्फे आयोजित पुढारी अॅग्रीपंढरी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शनाची सांगता झाली. सांगलीसह सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांतील हजारो शेतकर्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. या प्रदर्शनामुळे त्यांना शेतीतील नवे प्रयोग आणि नव्या तंत्राची ओळख झाली.
सांगलीत विजयनगर येथे जिल्हा कृषी विभागाच्या भव्य मैदानावर हे प्रदर्शन भरले होते. ऑर्बिट क्रॉप मायक्रोन्युट्रियंटस् हे मुख्य प्रायोजक, रॉनिक स्मार्ट आणि आरसीएफ हे सहप्रायोजक, तर सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हे या प्रदर्शनाचे हेल्थ प्रायोजक होते.
चाळीस एकरांहून जास्त जागेवर आयोजित या प्रदर्शनामध्ये देश-परदेशातील तीसपेक्षा अधिक पिकांचे प्रत्यक्ष लागवड प्रात्यक्षिक शेतकर्यांना पाहायला मिळाले. यानिमित्ताने विकसित केलेली, भरघोस उत्पादन देणारी विविध पिके, नवनवीन संकरित वाण, भाजीपाला, फुलवर्गीय पिके यांची माहिती शेतकर्यांना मिळाली. या प्रदर्शनात ठिबक सिंचन, तुषार सिंचन, धान्य निवडक यंत्रे, अत्याधुनिक कृषी अवजारे, मल्चिंग पेपर, शेडनेट, पाईप यासह खते, बी- बियाणे, कीटकनाशके, बुरशीनाशके, सेंद्रिय उत्पादने, सोलर पंप, मोटार पंप यांचे स्टॉल्स असल्याने आणि ट्रॅक्टर-अवजारे यांची प्रात्यक्षिके पाहता आली. यासह मत्स्यपालन, कुक्कुटपालन, हॅचरीजपासून ते पोल्ट्री व्यवसायापर्यंत सर्व ती माहिती त्यांना मिळाली. प्रदर्शनातील विविध कंपन्यांच्या स्टॉल्सभोवती शेतकर्यांची शेवटपर्यंत गर्दी होती.