

सांगली : पुढारी वृत्तसेवा
दैनिक पुढारी माध्यम समूह आणि राज्य शासनाच्या सांगली जिल्हा कृषी विभाग यांच्या वतीने आयोजित प्रदर्शन शुक्रवार दि. 15 ते 19 एप्रिल दरम्यान होत आहे. सांगलीत कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयामागे, विजयनगर येथे दि. 15 ते 19 एप्रिल दरम्यान हे प्रदर्शन होत आहे. सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे. या कृषी प्रदर्शनाची शेतकर्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे.
'अॅग्री पंढरी' कृषी प्रदर्शनाचे ऑरबीट प्रायोजक आहेत, रॉनिक स्मार्ट 'दि कुटे ग्रुप' सहप्रायोजक, तर 'केसरी' हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत.
प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 15 रोजी सायंकाळी 5 वाजता कृषी, सहकार, सामाजिक न्याय, अन्नपुरवठा ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दैनिक 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार वेताळ, ऑरबीट ग्रुपचे चेअरमन दीपक राजमाने, मिरजेचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, कुट्टे ग्रुपचे एरिया सेल्स मॅनेजर सतीश पवार, केसरी टुर्सच्या संचालिका झेलम चौबळ आणि रॉनिक वॉटर हिटरचे तानाजी पवार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात ड्रोनचे प्रात्यक्षिक हे प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. यामध्ये ड्रोनने औषध फवारणी आदी शेतीकामे कशी होतात, ते येथे बघायला मिळेल. तसेच खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, दोन पिकांमधील अंतर, सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शनासह ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, ब्लोअर, रोप लावणी यंत्रांसह कृषी अवजारांचे अनेक अद्ययावत प्रकार प्रात्यक्षिकांसह उपलब्ध असतील.
या प्रदर्शनातील स्टॉलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत कंपन्यांची उत्पादने या प्रदर्शनात पाहावयास मिळणार आहेत. प्रात्यक्षिकासाठी लावण्यात आलेली फुले आणि फळे परिपूर्ण तयार झाली आहेत. यामध्ये कोबी, हिरवे वांगे, गवारी, स्वीटकॉर्न, काकडी, कलिंगड, पिवळी झुकेणी, ढबू मिरची, दोडका, हिरवा माठ, झेंडूचे वेगवेगळे प्रकार इत्यादी तब्बल 50 पेक्षा अधिक पिकांची या ठिकाणी लागवड करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 8805007148, 9850844271 आणि 9766213003.
प्रदर्शनात खते, बी-बियाणे, औषधे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाईप लाईन, वीज पंप, सोलर पंप, शेती विषयक पुस्तके, शासकीय योजना, गांडूळ खत, मल्चिंग पेपर, शेततळे कागद, मंडपसाठी लागणारी तार, रोटावेटर, पॉवर टिलर, ग्रास कटर, ट्रॅक्टर, दूध काढणी यंत्र, बेदाणा प्रात्यक्षिक, कडबा कुट्टी, कृषी महाविद्यालये, सेंद्रिय खते, वित्तीय संस्था, दूध उत्पादक संघ, डेअरी, पॅकेजिंग इंडस्ट्रीज, प्रयोगशाळा इत्यादी प्रकारचे स्टॉल या प्रदर्शनात शेतकर्यांना पाहावयास मिळणार आहे.