

सांगली; पुढारी वृत्तसेवा: नोकरीच्या आमिषाने फसवून आणलेल्या एका तीस वर्षीय बांग्लादेशी महिलेची वेश्याव्यवसायासाठी गोकुळनगरात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिलेला 30 जूनपासून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडल्याचेही समोर आले असून, पीडित महिलेने विश्रामबाग पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी एका महिलेसह चार जणांच्या विरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
संशयितामध्ये राधा नामक महिला, महाभुरा भुया ( रा. शेगरेहाट, ठाणा सोनारगंज, जिल्हा नारायणगंज , बांग्लादेश), राजू आणि कालू अशी त्यांची नावे आहेत. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित महाभुरा भुया याने मेडिकल संदर्भात नोकरी देण्याचे आमिष दाखविले. महिन्याला तीस हजार रुपये पगार मिळेल, असे सांगून भारतात आणले. त्यानंतर गोकुळनगरमध्ये आणून चाळीस हजार रुपयांना विक्री केली. त्यानंतर राधा नामक महिला, राजू आणि कालू नामक दोन व्यक्ती अशा तिघांनी पीडितेवर वेश्याव्यवसाय करण्यासाठी दबाव आणला. 30 जून ते 15 जुलैपर्यंत आपल्याला नको असलेल्या व्यवसायात ढकलले होते.
दरम्यान, पीडितेची कैफीयत समोर आल्यानंतर आता पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली आहे.दरम्यान, संबंधित महिलेची कोणतीही कागदपत्रे नसतानाही बांग्लादेशातून भारतात आणण्यात आले आहे.