

सांगली; शशिकांत शिंदे : जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. घरोघरी फिरून प्रचार सुरू असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दिवसभर राबलेल्या कार्यकर्त्यांसाठी सकाळ, दुपार जेवणाची खास व्यवस्था हॉटेल, धाब्यावर करण्यात येत आहे. या निवडणूक प्रचारात अनेक ठिकाणी आचारसंहिताचे नियम धाब्यावर बसवलेले दिसून येत आहेत.
जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील ३६, तासगाव तालुक्यातील २६, कवठेमहांकाळ तालुक्यातील २८, जतमधील ८१, खानापूरमधील ४५, आटपाडीतील २५, पलूसमधील १५, कडेगावमधील ४३, वाळव्यातील ८८ व शिराळ्यातील ६० ग्रामपंचायतींचा सहभाग आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच आणि सदस्यपदांच्या ४७१६ जागांसाठी तब्बल १६ हजार ६५ उमेदवारांचे १६ हजार ४४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सरपंच पदाच्या ४४७ जागा आहेत. सरपंच पदाच्या जागेसाठी २ हजार ४५१ उमेदवार रिंगणात होते. पैकी ३८ गावच्या कारभाऱ्यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित ४०९ जागांसाठी १ हजार १२० उमेदवार रिंगणात आहेत. सदस्यपदाच्या ४ हजार ६९ जागा आहेत. त्यासाठी १४ हजार ३३० इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५ हजार ५६६ जणांनी माघार घेतली. सदस्यांच्या ५७० जागा बिनविरोध
झाल्या. उर्वरित ३ हजार ६९९ जागांसाठी ८ हजार ६०४ उमेदवार मैदानात उतरून नशीब आजमावत आहेत. गावांना थेट निधी मिळत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक हौशे-नवश्यांनी अर्ज दाखल केल्याने इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.
अर्ज माघार नंतर आता प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू झालेली आहे. निवडणुकीत विजयाचा मार्ग सुकर होण्यासाठी आणि आपणाला चांगले मतदान मिळावे यासाठी उमेदवारांच्या कडून आणि गावच्या प्रमुखांकडून वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवण्यात येत आहेत.
कोणत्याही निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांसाठी जेवणाची खास व्यवस्था करावी लागते. त्याशिवाय अलीकडे मतदारांनाही खुश करण्यासाठी त्यांना जेवणाची व्यवस्था केली जात आहे. काही उमेदवारांनी हॉटेल निश्चित करून त्याची कुपन देण्यात आलेली आहेत. हे कुपन दाखवल्यानंतर त्यांना जेवण देण्यात येत आहे. त्यामुळे हॉटेल, धाबे या ठिकाणी दिवस-रात्र गर्दी दिसून येत आहे. जमावबंदी असतानाही चौकाचौकामध्ये तरुणांचे ग्रुप थांबलेले दिसून येत आहेत. काही उमेदवारांनी तर चिन्ह असलेल्या वस्तूंचे वाटप सुरू केल्याची चर्चा आहे. वाढदिवस, यात्रा, महोत्सव या निमित्ताने उमेदवार विविध मंडळांना खुश करीत आहेत.