

लिंगनूर; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आता सुरू झाला असून, 360 रुपये ते 425 रुपये पेटी (प्रति 4 किलो) असा दर मिळाला आहे, अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकर्यांनी दिली. 70 टक्के बागा डिसेंबर व जानेवारी महिन्यात काढणीला येतील, असेही उत्पादकांनी सांगितले.
मिरज पूर्व भागातील लिंगनूर, खटाव, संतोषवाडी तर, कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळी, शिंदेवाडी व सांगोला भागात कोळे येथे काही द्राक्ष उत्पादक प्रतिवर्षी हंगामपूर्व फळ छाटणी जुलै व ऑगस्ट मध्ये घेतात. मात्र मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी अपवादानेच गावात एखादा लॉट काढणीला आला आहे. त्यामध्ये लिंगनूरमधील एक बाग व कोंगनोळीमधील तीन बागा यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सर्वप्रथम लिंगनूरमध्ये खाते उघडले असून द्राक्षांना 425 रुपये प्रति चार किलो दर मिळाला आहे. कोंगनोळी व भागातील द्राक्षांना दर्जा नुसार 360 ते 420 रुपयांपर्यंत दर मिळू लागला आहेे.
या वर्षी जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेकांनी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत फळ छाटण्या घेतल्या. त्यामुळे साडेतीन महिने कालावधी गृहीत धरता डिसेंबर व जानेवारी दरम्यान मार्केटिंगसाठी उत्पादित केलेल्या द्राक्षांची मोठी फळ काढणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बेदाणासाठीच्या उत्पादीत बागांचीही काढणी सुरू होणार आहे.
पावसाळी परिस्थितीमुळे सांगली जिल्ह्यात फळ छाटणी उशिरा झाल्याने व्यापारी अजून दाखल झाले नाहीत. तरीही दराने चांगली सुरुवात केली असून 350 ते अगदी 500 रुपयांपर्यंत दर्जा पाहून दर मिळतील अशी अपेक्षा उत्पादक करीत आहेत. असे असले तरी सध्या हंगामपूर्व काढणी सुरू असलेली द्राक्षे दर उच्चांकी घेतील, अशी आशा आहे.