

सांगली; संजय खंबाळे : गेल्या काही दिवसांपासून सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात डासांचा उच्छाद झाला आहे. अडीच महिन्यात जिल्ह्यात 57 जण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत तर 14 जणांना चिकुनगुनियाची बाधा झाली आहे. एकूण 71 जणांना बाधा झाली आहे. यामध्ये सांगली मनपा क्षेत्रातील रुग्ण संख्या जास्त आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात पावसाळ्यात डासांचा उच्छाद झाला आहे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तापाचे रुग्ण वाढले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत दि. 7 सप्टेंबरपर्यत महापालिका क्षेत्रात आणि ग्रामीण भागात ताप आलेल्या केवळ 270 रुग्णांच्या सॅम्पलची तपासणी करण्यात आली होती. या सर्वेमध्ये एकूण 57 रुग्ण डेंग्यूचे आणि 14 रुग्ण चिकुनगुनियाचे आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सांगली मनपा क्षेत्रासह जिल्ह्यात थंडी-तापाचे रुग्ण वाढले आहेत. रुग्णांलये गर्दीने फुल्ल झाली आहेत. रुग्ण संख्या कमी असल्याचा दावा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. मात्र तपासण्याच कमी होत असल्याने शासनाच्या दप्तदी आजाराचे रुग्ण कमी दिसत आहेत.
डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून पसरणारा विषाणूजन्य रोग आहे. एडीस इजिप्ती या जातीचा डास चावला की डेंग्यू होतो. तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या, अशी डेंग्यूची लक्षणे आहेत.
चिकुनगुनिया हा तापाचा आजार आहे. या आजारामध्ये ताप सुमारे तीन ते चार दिवस असतो. कधीकधी ताप थंडी वाजून येऊ शकातो. तसेच डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ होणे, उलटी होणे, पुरळ येणे अशी लक्षणे आहेत.
डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ आटोक्यात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून औषध फवारणीसह इतर प्रयत्न सुरू आहेत.
डेंग्यू, चिकुनगुनियाची रुग्ण संख्या नियंत्रणात आहे. साथ आटोक्यात ठेवण्यासाठी गाव निहाय प्लॅन केला आहे. लोकांनीही प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा.
– डॉ. दिलीप माने
जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. सांगली