सांगली जिल्ह्यातील 288 ग्रा. पं. सदस्य होणार अपात्र?

सांगली जिल्ह्यातील 288 ग्रा. पं. सदस्य होणार अपात्र?

तासगाव; दिलीप जाधव :  ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्यानंतर जात पडताळणी समितीने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणार्‍या जिल्ह्यातील 288 ग्रामपंचायत सदस्यांच्या डोक्यावर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार लटकू लागली आहे. जिल्हाधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी यांनी याबाबतचा अहवाल सर्व तहसीलदारांकडून मागितला आहे.

लवकरच 288 सदस्यांच्या अपात्रतेचे आदेश निघण्याची शक्यता आहे. तसे झाले तर अनेकांना सरपंचपदाला व सदस्य पदाला मुकावे लागणार असल्याने त्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत. सन 2021 मध्ये जिल्ह्याच्या एकूण 10 तालुक्यातील 152 ग्रामपंचायतींच्या 1 हजार 508 सदस्य पदासाठी सार्वत्रिक निवडणूक झाली होती. यापैकी 552 सदस्य अनुसूचित जाती/जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग या राखीव प्रवर्गातून निवडून आले होते. ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव प्रवर्गाच्या जागेवर निवडून आलेल्या सदस्याने मुदतीत जात पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ते सादर केले नाही, तर सदस्यत्वच रद्द करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत.

कोव्हिड -19 च्या जाचक निर्बंधामुळे राखीव जागांवर विजयी झालेल्या 552 उमेदवारांपैकी अनेकांना मुदतीत त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र मिळू शकले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला राखीव प्रवर्गातून निवडून येऊन सरपंच झालेले आणि इतरही सदस्य यांना पदावरून पायउतार व्हावे लागणार होते. यामुळे अशा उमेदवारांनी ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. यानंतर विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुन्हा एकदा एक वर्षांची मुदतवाढ देण्याची घोषणा तत्कालीन ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. त्यानुसार जानेवारी 2023 अखेर सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मुश्रीफ यांनी दिलेली वर्षाची मुदतवाढ जानेवारीत संपली. या मुदतवाढीचा कालावधी संपताच जिल्हाधिकारी डॉ. एम राजा दयानिधी यांनी तहसीलदारांकडून जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या सदस्यांची यादी मागवली. त्यानुसार जिल्ह्यात राखीव जागांवर निवडून आलेल्या 552 पैकी 264 सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे. 288 सदस्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे उघडकीस आले आहे.

जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे गावनिहाय सदस्य

जत तालुका (75) : जालीहाळ खुर्द (3), कुडनूर (3), उंटवाडी (1), तिकोंडी (4), उमराणी (6), निगडी बु. (1), उटगी (2), अंकलगी (3), वळसंग (1), गुड्डापूर (2), लमानतांडा उटगी (2), मेंधीगिरी (5), शेड्याळ (3), करेवाडी ति. (2), अंकले (4), भिवर्गी (4), गुगवाड (5), मोरबगी (1), डोर्ली (2), घोलेश्वर (1) सिध्दनाथ (2), सनमडी मायथळ (4), सिंगनहळी (2), शेगाव (7), टोणेवाडी (2)
पलूस तालुका (31): आंधळी (4), भिलवडी (1), भिलवडी स्टेशन (3), बुरुंगवाडी (1), खंडोबाचीवाडी (2), मोराळे राजापूर (2), नागठाणे (5), रामानंदनगर (3), सूर्यगाव खोलेवाडी (2), तावदरवाडी (2), तुपारी (2), माळवाडी (4)
खानापूर तालुका (26) : मंगरुळ (4), पारे (4), नागेवाडी (4), देविखिंडी (1), माहुली (3), पोसेवाडी (3), खंबाळे भा. (2), तांदळगाव (1), भिकवडी बु. (3), शेडगेवाडी (1)
आटपाडी तालुका (4) : विठलापूर (1) बोंबेवाडी (1), शेटफळे (1), धावडवाडी (1)
मिरज तालुका (34) : विजयनगर (3), लिंगनूर (4), ढवळी (1), कवठेपिरान (6), म्हैसाळ (4), शिंदेवाडी (2), एरंडोली (3), मालगाव (2), तानंग (1), कर्नाळ (1), कवलापूर (2), अंकली (5).

तक्रारीची वाट न पाहता थेट कारवाई?

राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवाराने मुदतीत जात वैधतेचे प्रमाणपत्र सादर केले नाही तर सदस्यत्वच रद्द होते; पण तक्रार आल्याशिवाय जिल्हाधिकारी अपात्र ठरवत नाहीत. आता मात्र असे होणार नाही, दोन वर्षे मुदतवाढ देऊनसुध्दा जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणार्‍या सदस्यांची गय केली जाणार नाही. सर्व 288 सदस्यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाली आहेत. कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता प्रशासनाकडून थेट अपात्रेबाबतचे आदेश काढण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. येत्या 15 दिवसात सदरचे आदेश निघण्याची शक्यता आहे.

तासगाव तालुका टॉपवर

जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणार्‍या सदस्यांच्या आकडेवारीत तासगाव तालुका टॉपवर आहे. तालुक्यातील 97 सदस्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये काहीजण सरपंच आहेत तर काहीजण आता तासगाव बाजार समिती निवडणुकीत निवडून येऊन संचालक झाले आहेत. त्यांची गावनिहाय संख्या पुढीलप्रमाणे : गोटेवाडी (1), वाघापूर (2), मोराळे पेड (2), वज्रचौंडे (3), नरसेवाडी (2), लोकरेवाडी (2), यमगरवाडी (2), येळावी (2), डोर्ली (2), सावळज (8), हातनूर (6), नागाव कवठे (2), मांजर्डे (5), राजापूर (4), हातनोली (2), पेड (2), निंबळक (2), कौलगे (3), गव्हाण (2), सिध्देवाडी (4), जुळेवाडी (1), शिरगाव वि. (2), ढवळी (4), धुळगाव (2), कवठेएकंद (2), पाडळी (3), डोंगरसोनी (5), विसापूर (3), बोरगाव (4), लोढे (2), वडगाव (3), जरंडी (3), दहिवडी (3), तुरची (1) गौरगाव (1).

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news