सांगली जिल्ह्यातील 14 विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये

सांगली जिल्ह्यातील 14 विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये
Published on
Updated on

सांगली/कडेगाव/कासेगाव ; पुढारी वृत्तसेवा : युक्रेनमध्ये युद्धाची धुमश्‍चक्री सुरू असून तिथे सांगली जिल्ह्यातील किमान चौदा विद्यार्थी अडकले असावेत, अशी प्राथमिक माहिती आहे. जिल्हा प्रशासनाने दहा विद्यार्थी अडकल्याची माहिती दिली आहे. मात्र, ती संख्या अधिक असण्याची शक्यता आहे.

व्यवसाय अथवा शिक्षणासाठी जिल्ह्यातील अनेकजण युक्रेनमध्ये गेले आहेत. अशांची नावे जिल्हा प्रशासनाने मागविली होती. त्यानुसार पहिल्या दिवशी 10 विद्यार्थ्यांची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाकडे झाली आहेत. यामध्ये पृथ्वीराज विजय सुतार (वाळवा), अभिषेक प्रकाश पाटील (तुंग, ता. मिरज), प्रथमेश सुनील हंकारे (कसबे डिग्रज, ता. मिरज), तोहिद बशीर मुल्ला (सांगली-संजयनगर) विशाल सुभाष मोरे, आदित्य अर्जुन पुसावळे, स्नेहल नवनाथ सावंत, संध्या रामचंद्र मोरे (चौघेही रा. दिघंची, ता. आटपाडी), कोमल तानाजी लवटे (विठलापूर, ता. आटपाडी) आणि यश मनोज पाटील (जत) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्वजण युक्रेनमधील विविध विद्यापीठांत उच्च शिक्षण घेत आहेत.

हिंगणगाव खुर्द (ता. कडेगाव) येथील ऐश्‍वर्या सुनील पाटील व कडेपूर येथील शिवांजली दत्तात्रय यादव या दोन विद्यार्थीनी युक्रेनमध्ये अडकल्या आहेत. पण त्यांची नोंद जिल्हा प्रशासनाकडे अजून झालेली नाही. त्यांच्या अन्न-पाण्याची गैरसोय होत आहे. या विद्यार्थिनींनी नातेवाईकांमार्फत सरकारकडे मदत मागितली आहे.

वाटेगाव (ता. वाळवा) येथील श्रद्धा महावीर शेटे (वय 21), साक्षी महावीर शेटे (वय 22) या दोन सख्या बहिणींही युक्रेनमध्ये अडकल्या आहेत. त्या एमबीबीएसच्या पहिल्या वर्षासाठी तेथे शिकत आहेत.

सततच्या बाँम्ब हल्ल्यांमुळे या सर्वांचा जीव धोक्यात आला आहे. जिवाच्या भितीने अनेकजण बंकरमध्ये लपले आहेत. काहींना अन्न-पाणीही मिळणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे त्यांचे नातेवाईक कासावीस झाले आहेत. आपल्या मुलांना वाचविण्यासाठी अनेकांनी जिल्हा प्रशासनाला साकडे घातले आहे. प्रशासनाने ही माहिती केंद्र सरकारतर्फे युक्रेनच्या दूतावासास कळविली आहे. सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सरकारचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एका सुरक्षितस्थळी ठेवल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. त्यांना भारतीय दुतावासाला कल्पना दिल्याशिवाय युक्रेन न सोडण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. आणखी काही विद्यार्थी तिथे अडकून पडल्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने संबंधितांची नावे द्यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या विद्यार्थ्यांनी भारतात येण्यासाठी केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. त्यांना परत आणण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news