सांगली : जिल्ह्यात 70 टक्के एस. टी. पूर्ववत

सांगली : जिल्ह्यात 70 टक्के एस. टी. पूर्ववत

सांगली : पुढारी वृत्तसेवा : एस. टी. चे शासकीय सेवेत विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी गेल्या चार महिन्यांपासून सुरू असणार्‍या कर्मचार्‍यांचा संप अद्यापही सुरूच आहे. परिणामी जिल्ह्यात 30 टक्के वाहतूक अद्यापही बंदच आहे. मात्र, 70 टक्के वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात दररोज 453 गाड्या 2 हजार 178 फेर्‍या मारत आहेत.

नोव्हेंबर महिन्यात एस.टी. कर्मचार्‍यांनी संप सुरू केला होता. सुरुवातीला या संपाची धार तीव्र होती. संपातील काही कर्मचारी पुन्हा सेवेत विलीनीकरणाशिवाय कामावर येण्यास इच्छुक नव्हते. मात्र, काही कर्मचार्‍यांवर निलंबन, सेवासमाप्ती अशी कारवाई वरिष्ठांकडून सुरू झाली. त्यानंतर कारवाईच्या धास्तीने अनेक कर्मचारी कामावर हळूहळू हजर होऊ लागले. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी दुसर्‍या बाजूला महामंडळातर्फे रोजंदारीवर कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येऊ लागली.

सांगली आगारातून सध्या 60 गाड्या तसेच मिरज आगारातून 65, इस्लामपूर 68, तासगाव 33, कवठेमहांकाळ 34, आटपाडी 34, जत 40, पलूस 35, शिराळा 22 आणि विटा आगारातून 56 अशा एकूण सुमारे 453 गाड्या 2 हजार 178 फेर्‍या करीत आहेत. दररोज या गाड्या सुमारे 1 लाख 50 हजार किलोमीटरचा प्रवास करीत आहेत. त्यामधून सरासरी दररोज 1 लाख 17 हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. यापूर्वी दररोज सरासरी 65 लाख असणारे उत्पन्न सध्या 50 लाखांवर आले आहे. त्यामुळे नेहेमी तोट्यातच असणारे ए. टी.चे चाक पुन्हा तोट्यातच रुततच आहे.

कामावर हजर न झाल्याने एस. टी. प्रशासनाकडून आतापर्यंत 823 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबन केलेल्यांपैकी 238 जण हजर झाल्याने त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना थेट ड्युटी देण्यात आली आहे. 791 जणांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सध्या 2 हजार 215 कर्मचारी कामांवर हजर झाले आहेत. 785 कर्मचारी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम असून ते कामांवर हजर झाले नाहीत.

एस. टी. तील कर्मचार्‍यांची कमी असलेली संख्या भरून काढण्यासाठी महामंडळाने कंत्राटी पद्धतीने 62 कर्मचार्‍यांची भरती केली आहे. सध्या त्यापैकी 45 जण हजर आहेत. त्यांना दरमहा 19 हजार रुपये मोबदला देण्यात येत आहे.

निलंबन आणि सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आलेल्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेकांच्या घरी दोन वेळच्या जेवणाचे वांदे झाले आहेत. आमच्यावर अन्याय झाल्याची त्यांची प्रतिक्रिया आहे.महामंडळाने सहानुभूतीने विचार करून पुन्हा सेवेत घेण्याची मागणी ते करीत आहेत.

खासगी वाहतूकदारांकडून मनमानी भाडे आकारणी
जिल्ह्यात अद्यापही पूर्ण क्षमतेने एस. टी. वाहतूक सुरू नाही. त्याचा फायदा खासगी वाहतूकदार घेत आहेत. काही भागांत वडाप, रिक्षा, ट्रॅक्सीचालक मनात येईल त्या दराने भाडे घेत आहेत. प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news