

सांगली : सुनील कदम
माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या मंडळींच्या 'घरवापसी'चा नारळ फुटला, असे समजण्यास हरकत नाही. भविष्यात एक-एक करीत राष्ट्रवादीतून भाजपात गेलेली मंडळी परतीच्या प्रवासाला लागण्याचे संकेत यातून दिसत आहेत.जिल्ह्याच्या राजकारणात कधीही भाजपचे दखलपात्र स्वरूपाचे स्थान नव्हते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकीय साठमारीत भाजपाला यश मिळत गेले, असे म्हणावे लागेल. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यातच खरी रस्सीखेच होती आणि आजही आहे. शिवाय या राजकीय वादाला 'दादा गट' विरुद्ध 'बापू गट अशीही एक किनार आहे. राष्ट्रवादीच्या राज्यातील आणि जिल्ह्यातील नेत्यांनी सुरुवातीपासूनच जिल्ह्याच्या राजकारणात दादा गटाचे खच्चीकरण करण्याची एकही संधी सोडलेली नाही. अगदी सुरुवातीच्या काळात स्व. विष्णूअण्णा पाटील आणि स्व. मदन पाटील या दादा गटाच्या शिलेदारांनाही राष्ट्रवादीत असूनसुध्दा राष्ट्रवादीच्याच दादाविरोधी राजकारणाचा दणका बसला.
राष्ट्रवादीच्या या काँग्रेसविरोधी आणि प्रामुख्याने दादा गटविरोधी राजकारणातूनच भाजपला रसद मिळायला सुरुवात झाली. केवळ रसदच नव्हे तर विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील, खा. संजय पाटील असे आपले काही बिनीचे शिलेदारही राष्ट्रवादीने भाजपाच्या पारड्यात टाकले होते. हे सगळे काही झाले होते ते केवळ काँग्रेसला नामोहरम करण्यासाठीच! त्याचा योग्य तो परिणाम होऊन जतमधून विलासराव जगताप, शिराळ्यातून शिवाजीराव नाईक, सांगलीतून सुधीर गाडगीळ आणि मिरजेतून सुरेश खाडे असे भाजपाचे चार-चार आमदार निवडून आले. गाडगीळ आणि खाडेंच्या विजयाला राष्ट्रवादीचा हातभार लागला होता, हे कुणीही नाकारू शकत नाही. परिणामी जिल्ह्यातील भाजपाचा उल्लेख गमतीने 'जेजेपी' (जयंत जनता पार्टी) असा होत होता आणि आजही होतोय.
कालांतराने राष्ट्रवादीकडून उसने अवसान मिळालेल्या भाजपाने जिल्हा परिषद आणि महापालिकेची सत्ता काबीज केली; पण तिथेही विजयाचा तोंडावळा होता तो राष्ट्रवादीचाच. कारण नेत्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांनीच भाजपाचा सत्तासोपान सोपा करून ठेवला होता. आज भाजपाच्या माध्यमातून विविध सत्तास्थानांवर बसलेली बहुतांश मंडळी ही पूर्वाश्रमीची राष्ट्रवादीचीच आहेत.
मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पूर्वी काँग्रेसविरोधी राजकारणासाठी खा. शरद पवार आणि भाजपाचे अंतर्गत सख्य होते मात्र भविष्यातील राजकारणाच्या दृष्टिकोनातून खा. पवार यांनीही आता भाजपाशी उभा दावा मांडलेला दिसत आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने जयंत पाटील यांना अवघा जिल्हा 'शत प्रतिशत राष्ट्रवादीमय' करण्याचे वेध लागले आहेत. शेजारच्या सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्यापेक्षा महत्वाचे स्थान मिळविण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यातील राजकीय ताकद आपल्या पाठीशी असण्याची बहुदा त्यांना जाणीव झाली असावी. त्यातूनच गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीने जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा बेरजेच्या राजकारणाला सुरूवात केल्याचे दिसत आहे. ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. पूर्वी स्वत:हून भाजपाच्या पारड्यात टाकलेल्या सांगली आणि मिरज या दोन जागा मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने चाचपणी सुरू केली आहे.
आज जिल्हा बँकेच्या रूपाने जिल्ह्यातील अर्थकारणाच्या नाड्याही राष्ट्रवादीच्या हातात आहेत. शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी प्रवेश याच माध्यमातून झाला आहे. नाईक यांच्याप्रमाणेच आज खा. संजय पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या अखत्यारीतील सहकारी संस्थाही वेगवेगळ्या कारणांनी आर्थिक अरिष्टात सापडलेल्या दिसत आहेत. या सहकारी संस्थाच या मंडळींच्या राजकारणाचा पाया आहेत, त्या टिकल्या तरच यांचे राजकारण टिकणार आहे आणि यांना बळकटी दिल्याशिवाय राष्ट्रवादीच्या राजकारणाला बळकटी येणार नाही, याची राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही जाणीव आहे. त्यामुळे नजीकच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने मुळातच राष्ट्रवादीच्या असलेल्या या मंडळींना राष्ट्रवादीने मूळ प्रवाहात सामील करून घेतले तर आश्चर्य वाटायला नको. शिवाजीराव नाईक यांच्या रूपाने या घरवापसीची सुरुवात झाली आहे, असे समजण्यास हरकत नाही.
एकेकाळी सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, कितीही वादळे आली तरी काँग्रेसच्या या गडकोटाचा एक चिरासुद्धा हलत नव्हता. पण अलीकडे काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याची भयावह पडझड झालेली दिसते आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे इनमीन दोन आमदार आहेत. काँग्रेसचे अस्तित्व काहीसे निस्तेज झाल्याचे दिसत आहे. पण अजूनही काँग्रेसकडे जिल्हाभर निष्ठावान कार्यकर्त्यांची मजबूत फळी असलेली दिसून येत आहे. सत्तेसाठी राष्ट्रवादीच्या भल्याभल्यांनी भाजपाशी राजकीय सोयरिक केली, पण एक-दोन अपवाद वगळता काँग्रेसचा एकही मोठा नेता भाजपवासी झालेला दिसत नाहीत. स्थानिक कार्यकर्तेही दबत-पिचत का होईना; पण काँग्रेसचा झेंडा खांद्यावर मिरविण्यात धन्यता मानताना दिसतायत.