सांगली , पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत गोल्डन ई- कार्ड काढण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये असणार्या संग्राम कक्षामध्ये हे कार्ड मोफत काढून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी तत्काळ आपली गोल्डन ई- कार्ड काढावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्ह्यात गोल्डन ई – कार्डसाठी 5 लाख 26 हजार 770 लाभार्थी पात्र असून आतार्यंत 1 लाख 43 हजार 311 लाभार्थ्यांनी ई-कार्ड घेतली आहेत. उर्ववरीत 3 लाख 83 हजार 459 लाभार्थ्यांनी तत्काळ ई- कार्ड काढून घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले.
आर्थिकदृष्ट्या मागास असणार्या लोकांसाठी मोफत आरोग्यसुविधा देण्यात येत आहे. शासनाने 2011-12 च्या दरम्यान केलेल्या सर्व्हेनुसार जिल्ह्यात या योजनेअंतर्गत मोफत आरोग्य सेवेसाठी 5 लाख 26 हजार 770 जण पात्र आहेत. या सर्वांना शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी निवडलेल्या रुग्णालयांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत होणार आहेत. यासाठी संबंधित लाभार्थ्याकडे गोल्डन ई-कार्ड असणे आवश्यक आहे.
हे कार्ड लवकरात लवकर सर्वांना मिळावे यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेने 30 जूनपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-कार्ड देण्याचे नियोजन केले आहे. या कार्डसाठी पात्र असणार्या लाभार्थ्यांनी तत्काळ गावच्या ग्रामपंचायतीत असणार्या संग्राम कक्षातून हे कार्ड घेण्याचे आहे.
अद्याप गोल्डन ई-कार्ड न घेतलेल्यांची यादी करण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्यापही 3 लाख 38 हजार 459 लोकांनी हे कार्ड घेतलेले नाही. यामध्ये ग्रामीण भागातील 3 लाख 37 हजार 853 व नगरपालिका-महापालिका क्षेत्रांतील 45 हजार 606 जणांचा समावेश आहे.