

सांगली; पुढारी वृत्तसेवा : शंभरफुटी रस्त्यावरील गुलाब कॉलनीत नालसाब मुल्ला या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याचा गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी आणखी तिघांना विश्रामबाग पोलिसांनी बुधवारी अटक केली. दरम्यान, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कोल्हापुरातील कळंबा कारागृहात असलेल्या सचिन डोंगरे (रा. गुलाब कॉलनी, सांगली) याच्याविरूद्ध अखेर या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
अटक केलेल्यांमध्ये रोहित अंकुश मंडले (वय 20), प्रशांत उर्फ बबलू संभाजी चव्हाण (21, रा. खरशिंग), ऋत्विक बुद्ध माने (22, रा. कोकळे, ता. कवठेमहांकाळ) यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी सनी सुनील कुरणे (वय 23, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ), विशाल सुरेश कोळपे (20, लिंबेवाडी), स्वप्निल संतोष मलमे (27, खरशिंग, ता. कवठेमहांकाळ) व एक अल्पवयीन यांचा समावेश आहे. यातील मलमे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध खुनाचा प्रयत्न, धमकावणे, चोरी यासह चार गंभीर गुन्हे कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद आहेत.
नालसाब मुल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता होता. यापूर्वी त्यांच्याविरूद्ध खून, सावकारी व बेकायदा हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल होता. गेल्या काही वर्षापासून त्याने सामाजिक कार्यात उडी घेतली होती. शनिवारी रात्री तोे जेवण करून घराबाहेर अंगणात बाकावर बसले होता. त्यावेळी अंधारातून चार संशयित आले. त्यांनी मुल्लावर धडाधड गोळीबार केला. यामध्ये मुल्ला काही क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडून मरण पावला होता. शंभरफुटी रस्त्यावर महेश नाईक या तरुणाचा 2018 मध्ये खून झाला होता. याप्रकरणी गुलाब कॉलनीतील सचिन डोंगरे याच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली होती.
डोंगरे हा खुनाचा मुख्य सुत्रधार होता. पोलिस चौकशीत त्याने नाईकचा खून नालसाब मुल्ला व त्याचा भाऊ मुस्ताक मुल्ला याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली. या प्रकरणात नालसाबला अटक केली. मुस्ताक हा फरारी झाला. तो अजूनही फरारीच आहे. नाईक खून प्रकरणात नालसाबला अटक झाली. यातून त्याला मोक्का लागला. नालसाब कळंबा कारागृहात होता. त्याच्यासोबत सचिन डोंगरेही होता. 'तू नाईकच्या खुनात माझे नाव का घेतलास', असा नालसाबने त्याला डोंगरला जाब विचारला. यातून त्यांच्यात कारागृहात अनेकदा खटकेही उडाले होते दीड वर्षापूर्वी नालसाब मुल्ला जामिनावर बाहेर आला. सचिन डोंगरे याला जामीन मिळालाच नाही. तो जामिनासाठी प्रयत्न करीत होता. मात्र नालसाब त्याला जामीन मिळू नये, यासाठी 'फिल्डींग' लाऊन होता.
नालसाबचा खून करणास सात हल्लेखोर गेले होते. या सर्वांना अटक झाली आहे. गोळ्या झाडण्यासाठी वापरलेली पिस्तूले जतमधून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासासाठी पोलिसांचे पथक जतला रवाना करण्यात आले आहे.