सांगली : गंडा घालणारे द्राक्ष दलाल मोकाटच

सांगली : गंडा घालणारे द्राक्ष दलाल मोकाटच
Published on
Updated on

तासगाव; विठ्ठल चव्हाण :  द्राक्ष दलालाला 1 कोटी 10 लाखांना लुटणार्‍या टोळीच्या पोलिसांनी अवघ्या आठ तासांत मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. मात्र, बागायतदारांची दरवर्षी कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे काही दलाल मोकाट कसे, असा प्रश्न द्राक्षबागायतदारांतून विचारला जात आहे.

द्राक्षपंढरी म्हणून तासगाव तालुक्याची ओळख आहे. इथला शेतकरी रात्रंदिवस काबाडकष्ट करून द्राक्षबाग पिकवतो. मातीतून सोने पिकवण्याची किमया त्याने करून दाखवली आहे. द्राक्ष क्षेत्रात क्रांती केली आहे. अनेक नवनवीन वाणाची निर्मिती करून आपला लौकिक वाढवून द्राक्ष शेतीच्या आधुनिकीकरणाची बीजे रोवली आहेत. नैसर्गिक संकट, मानवनिर्मित संकटे (दर पाडून द्राक्ष खरेदी, औषध कंपन्यांकडून बोगस औषधे बागायतदारांच्या माथी मारणे) यावर मात करून द्राक्षे पिकवण्यात बागायतदार मागे राहिला नाही.

मात्र गेल्या अनेक वर्षापासून द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक करणारी द्राक्ष दलालांची टोळी सक्रिय झाली आहे. दरवर्षी बागायतदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक होते. गेल्या काही वर्षांतील हा फसवणुकीचा आकडा काढल्यास तो 100 कोटींहून अधिक पुढे गेला असेल. फसवणूक झाल्यानंतर अनेक बागायतदार पोलिस ठाण्यात जाऊन फसवणूक झालेल्या दलालाविरोधात गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलिस ठाण्यात चकरा मारतात. अनेक पुरावे, कागदपत्रे मागून बागायतदारांना हैराण केले जाते. पोलिसांचा तपास वर्षानुवर्षे पुढे सरकत नाही. त्यामुळे दलालांचे फावले आहे. मात्र, गेल्या आठवड्यात येथील एका दलालाची 1 कोटी 10 लाखाची रोकड चोरट्यांनी लुटली. त्यावेळी झाडून सारी पोलिस यंत्रणा कामाला लागली. आठ तासांत तीन संशयितांना ताब्यात घेऊन रोकड जप्त केली. अशी तत्परता बागायतदारांच्या फसवणूक वेळी का दाखवली जात नाही, असा सवाल विचारला जात आहे.

द्राक्ष फसवणूकप्रकरणी पोलिसांत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी किती गुन्ह्यात दलालांना अटक झाली, किती गुन्ह्यात शिक्षा लागली. किती शेतकर्‍यांना फसवणूक प्रकरणातील पैसे परत मिळाले, याचा लेखाजोखा पोलिसांनी मांडण्याची आवश्यकता आहे, तशी मागणीही होऊ लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news