कुरळप; पुढारी वृत्तसेवा : कुरळप व परिसरात अवैध धंद्यात वाढ झाली आहे. झटपट मिळणारा पैसा यामुळे तरुण वर्ग अवैध धंद्यात गुंतला आहे. परिसरात खुलेआम जुगार अड्डे, देशी दारूची अवैध विक्री, जनावरांची चोरी, सावकारी आदी प्रकारांनी सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे.
कुरळपसह परिसरात सावकारी वाढली आहे. महिन्याला 10 ते 30 टक्क्यांनी जबरी वसुली केली जात आहे. अडलेले शेतकरी, छोटे व्यवसायिक सावकारीला बळी पडत आहेत. परिसरात विदेशी, देशी दारूची अवैध विक्री सुरू आहे. रात्रीच्यावेळी दारूची चोरटी वाहतूक केली जात आहे. पानपट्टी, किराणा दुकानातही गुटखा मिळत आहे. याचे कनेक्शन कर्नाटकपर्यंत असल्याची चर्चा आहे. परिसरात मटका (जुगार) चिठ्ठ्या घेतल्या जात आहेत. छोटे व्यावसायिक, मजूर यामध्ये गुंतले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. हे अवैध प्रकार सुरू असताना काही राजकीय लोकांचे पाठबळ संंबंधितांना मिळत आहे.
अवैध धंद्यातून मिळणारी माया यातून अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. लाखो रुपयांची स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. दिमतीला चारचाकी, रुबाब त्यामुळे काही तरुणही अवैध धंद्यात गुंतू लागले आहेत. त्यामुळे कुरळपसह परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. कुरळप व परिसरात अवैध धंद्यांना ऊत आला असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. अवैध धंद्याची माहिती पोलिसांना देऊनही कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतातील वस्तीवरून लाखो रुपयांची जनावरे वाहनात भरून चोरून नेली जात आहेत. यामध्येही काहीजण गुंतल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही जनावरे सांगोला, सोलापूर, पंढरपूर परिसरात नेऊन विकली जात आहेत. त्याचे कनेक्शनही आता कुरळप परिसरापर्यंत आहे काय, अशी शंका ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.