सांगली : ‘काळू-बाळू’सह 6 मातब्बर फड बंद!

सांगली : ‘काळू-बाळू’सह 6 मातब्बर फड बंद!
Published on
Updated on

सांगली;  सचिन लाड :  तमाशा…उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारा…दिल्लीच्या तख्ताचीही वाहवा मिळविणारा…तब्बल 50 वर्षे या कलाप्रकारावर हुकूमत गाजविणारे कवलापूर (ता. मिरज, जि. सांगली) येथील 'काळू-बाळू'सह राज्यातील सहा मोठे तमाशे बंद पडले आहेत.

दोन वर्षे कोरोना… प्रेक्षकांची पाठ व डिझेलच्या वाढत्या दरामुळे हे फड आर्थिक संकटात सापडले आहेत. यावर्षी केवळ आठच फड विजयादशमीला (दसरा) रिवाजानुसार लवाजम्यासह बाहेर पडले आहेत. पण पावसाचा त्यांना जबरदस्त फटका बसला आहे. एक-दोन शो करून हे फड विदर्भ आणि खानदेशात बसून आहेत.

तमाशा हेच दैवत मानून आपल्या जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात नेणारे जवळपास 225 लहान-मोठे फड आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रत्येकवर्षी विजयादशमीला सर्व फड बाहेर पडतात. तत्पूर्वी महिनाभर कलाकारांची जुळवा-जुळव, त्यांचा पगार, वाहनांची दुरूस्ती, लाईट व्यवस्था याचे नियोजन करण्यासाठी किमान 15 ते 20 लाख रुपये लागतात. दरवर्षी सावराकडून कर्ज काढून ही रक्कम उभा केली जाते.

काळू-बाळूसह, अंजली नाशिककर, भिका-भीमा सांगवीकर, कुंदा पाटील-पिंपळेकर, चंद्रकांत ढवळीपूरकर, दत्ता महाडिक-पुणेकर हे सहा तमाशांचे फड बंद आहेत. 80 रुपये तिकीट दर आहे. तिकीट काढून तमाशा पाहण्यास येणारा प्रेक्षक खूपच कमी झाला आहे. केवळ 35 ते 40 प्रेक्षकच येतात. यातून जमा होणार्‍या गल्ल्यातून काहीच भागत नाही. त्यामुळे हे फड बंद ठेवले आहेत. अर्थकारण बिघडल्याने ते आता जानेवारीत बाहेर पडण्याचे नियोजन करीत आहेत. गावोगावच्या यात्रा सुरू होतात. यात्रा कमिटीकडून 'सुपारी' घेऊन शो करण्याचा निर्णय या सहा फड मालकांनी घेतला आहे.

यावर्षी विजयादशमीला मंगल बनसोडे, रघुवीर खेडकर, मालती इनामदार, हरिभाऊ बडे, आनंद महाजन, विठाबाई नारायणगावकर, पांडुरंग मुळे, तुकाराम खेडकर-मांजरवाडीकर हे आठच फड लवाजम्यासह बाहेर पडले आहेत. मोठ्या फडामध्ये 80 ते 110 कलाकार असतात.

चैत्र महिन्यात पुणे जिल्ह्यातील नारायण गाव येथे 'सुपारी' घेण्यासाठी फड मालक एकत्रित येतात. तत्पूर्वी दिवाळीनंतर सांगली जिल्ह्यातील विटा – मायणी रस्त्यावर राहुट्या मारून 'सुपारी' घेतल्या जातात. लहान दीडशे तमाशा फड आहेत. ते केवळ चैत्र महिन्यातील यात्रांचा हंगाम करतात. तेही आर्थिक संकटात सापडले आहेत.

सात महिन्यांत दोनशेहून अधिक प्रयोग

विजयादशमीला बाहेर पडल्यानंतर ते डिसेंबरपर्यंत फडांचा विदर्भ, मराठवाड्यात मुक्काम असतो. तीन महिने दररोज प्रयोग सुरू असतात. मात्र जे फड आहेत, त्यांना पावसामुळे खेळ करता येईना झाले आहेत. जालना, बीड, नाशिक व खानदेशात हे फड बसून आहेत. अक्षयतृतीयेपर्यंत सुमारे दोनशेहून अधिक प्रयोग होतात. तिकिटावरील खेळ करण्यासाठी पोलिस, ग्रामपंचायतीला पैसे द्यावे लागतात. हा तोटाही सहन करावा लागत आहे.

कला जगविण्यासाठी कसरत

तमाशात सुरत्या, हलगी, ढोलकी, तुणतुण, पेटीमास्तर, नर्तिका असे 70 ते 80 कलाकार असतात. चालक, क्लिनर, आचारी, व्यवस्थापक असा शंभरजणांचा लवाजमा असतो. लोखंडी स्टेज, तंबू, गेट, चार राहुट्या, जनरेटर, साऊंड सिस्टीम हे साहित्य व कलाकारांचा लवाजमा नेण्यासाठी पाच ट्रक व एक जीप असते. फडातील सर्वांचे दोन वेळचे जेवण व वाहनांतील डिझेल हा सर्व डोलारा सांभाळताना तोटाच होतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news