

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कवलापूर (ता. मिरज) येथे विठ्ठल जाधव (वय 38, रा. बुधगाव) यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बुधगाव येथील दोघांना अवघ्या दहा तासात अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले
अजय संजय पवार (वय 23) व दौलत सर्जेराव पवार (37, दोघे रा. गोसावी गल्ली, बुधगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. अजय हा दौलतचा चुलत पुतण्या आहे. दौलतच्या एका नातेवाईक महिलेशी जाधव याचे अनैतिक संबंध होते, असा त्यांना संशय होता. यातून त्यांनी कवलापुरातील नियोजित विमानतळाच्या जागेवर 'गेम' केल्याची कबुली दिली आहे. दोघांनी धारदार कोयत्याने तब्बल 17 वार करून खून केल्याचे शवविच्छेदन तपासणीत स्पष्ट झाले आहेत.
सोमवारी दुपारी जाधवचा खून झाला होता. सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना उघडकीस आली होती. संशयित अजय पवार, दौलत पवार व मृत जाधव हे तिघेही गवंडी काम करीत होते. त्यामुळे जाधवची पवार यांच्या घरी नेहमी उठ-बस असायची. त्यातून त्याची दौलतच्या एका नातेवाईक महिलेशी ओळख झाली. जाधव हा तिला गाडीवरून फिरायला नेत असे. हा प्रकार अनेकदा पवार कुटुंबाने पाहिला होता. जाधवला समजही दिली होती. पण तरीही त्याच्या वर्तणुकीत काहीच सुधारणा झाली नाही.
गेल्या पाच वर्षापासून ही महिला नवर्याला सोडून माहेरी निघून गेली. आपल्या नातेवाईकाचा संसार उद्ध्वस्त झाल्याची भावना व संबंधित महिलेच्या पतीचे त्याचे हाल दौलतला सहन झाले नाहीत. त्याने पुतण्या अजयच्या मदतीने जाधवचा काटा काढण्याचे नियोजन केले.
जाधवचे कुपवाड येथील कापसे प्लॉटमध्ये फरशी बसविण्याचे काम सुरू होते. तिथे दौलत व अजय गेले. 'फरशी बसविण्याचे काम घेतले आहे, बघायला चल', असे म्हणून त्याला दुपारी सव्वाएक वाजता स्वत:च्या दुचाकीवरून घेतले. तेथून ते कवलापूरच्या नियोजित विमानतळाच्या जागेवर आले. दुचाकी थांबवून त्यांनी कोयता काढून थेट वार करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून भितीने जाधव पळत सुटला. त्याचा पाठलाग करीतच त्याच्यावर वार केले. तो मरण पावल्यानंतर ते निघून गेले.
खुनाच्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, हवालदार बिरोबा नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, आर्यन देशिंगकर यांनी बुधगाव, कवलापूर येथे संशयितांच्या शोधासाठी छापे टाकले. मध्यरात्री दौलत व अजय पवार यांना अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी खून केल्याची कबुली दिली. त्यांना पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
घटनास्थळी जाधवच्या मृतदेहाजवळ स्टिलचा तांब्या सापडला होता. तो रक्ताने माखलेला होता. याबद्दलचे गूढ उकलण्यास पोलिसांना अजून यश आले नाही. यासंदर्भात संशयितांकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. संशयितांनी खून केल्यानंतर कोयता कुठे फेकला, याबद्दल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.