कडेगाव; रजाअली पिरजादे : सध्या कडक उन्हाळ्याचा एप्रिल महिना सुरू असून दिवसेंदिवस उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. परिणामी तालुक्यातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. विहिरींनी तळ गाठला असून अनेक विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. तर तालुक्यातील तलावांची पाण्याची पातळी निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे तालुक्यात टंचाईची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, पाटबंधारे विभागासह टेंभू व ताकारी सिंचन विभागाने आगामी काळातील संभाव्य पाणी टंचाईच्यादृष्टीने सर्व तलाव पाण्याने भरून घ्यावीत व अवर्तनाचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.
तालुक्यातील कडेगाव येथील जुना चिखली रस्ता ते कडेपूर रस्ता परिसरात व अन्य भागात पाणी टंचाई भासू लागली आहे. या परिसरासह तालुक्यातील पूर्वभागात अनेक विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. गतवर्षी पेक्षा यावर्षी कडक उन्हाळा असणार असल्याचे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहेत. दिवसेंदिवस तापमान वाढू लागले असून उन्हाच्या तीव्र झळांनी लोक हैराण होऊ लागले आहेत. पाण्याची पातळी खालावल्याने शेती पिकावर याचा मोठा परिणाम होऊ लागला आहे. पाण्याअभावी ऊस पिकासह अन्य बागायत पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.
तालुक्यातील टेंभूच्या अखत्यारित असलेले कडेगाव, शाळगाव, हिंगणगाव, शिवाजीनगर, कोतीज, करांडेवाडी या सहा तलावापैकी शिवाजीनगर व हिंगणगाव हे दोन टेंभूचे अनुक्रमे टप्पे असल्याने या दोन्ही तलावात सध्या मुबलक पाणी आहे. परंतु अन्य तालावांची पातळी खालावली गेली आहे. मागील महिन्यात या तलावात काही प्रमाणात टेंभूचे पाणी सोडण्यात आले होते. परंतु वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर हे पाणी काही दिवसात संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने सर्वच तलाव पाण्याने भरून घेऊन ओढे, नाले व ओघळींनाही पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
कडेगाव : 88.38 (36.84)
शिवाजीनगर : 77.42 (72.46)
हिंगणगाव : 266.98 (196.15)
शाळगाव – बोंबालेवाडी : 80.74 (25.13) कोतिज : 51.77 (16.50)
करांडेवाडी : 48.50(47.57)