सांगली : इस्लामपूर पालिकेसाठी महाविकास आघाडी?

सांगली : इस्लामपूर पालिकेसाठी महाविकास आघाडी?

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणुका काँग्रेस, शिवसेनेला बरोबर घेवून महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे इस्लामपूर पालिका निवडणुकीत काँगे्रसला बरोबर घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांच्यात शुक्रवारी याबाबत प्राथमिक बैठकही झाली आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही वापरला जाणार आहे. त्यामुळे इस्लामपूर पालिका निवडणुकीत काँग्रेस, शिवसेनेला बरोबर घेवून निवडणूक लढविण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शहाजी पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, अ‍ॅड. धैर्यशील पाटील तसेच काँग्रेसच्या महिला सरचिटणीस अ‍ॅड. मनीषा रोेटे, शहर अध्यक्ष राजेंद्र शिंदे, उपाध्यक्ष अ‍ॅड. आकिब जमादार, अ‍ॅड.आर. आर. पाटील, इंदुताई चौधरी यांच्यामध्ये आघाडीबाबत बैठक झाली. या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचे व काँग्रेस आमच्यासोबत येण्यास अनुकूल असल्याचे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शहाजी पाटील यांनी सांगितले.

पालिका निवडणूक एकत्रित लढविण्यासाठी बैठक झाली असली तरी पक्षाचा अद्याप याबाबत काही निर्णय झालेला नाही. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे महिला काँगे्रसच्या सरचिटणीस अ‍ॅड. मनीषा रोटे यांनी सांगितले. तर काँगे्रसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादीसोबत लढविण्याबाबत अद्याप पक्षाचा आदेश आलेला नाही. जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीतही अद्याप चर्चा नाही, असे सांगितले.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अभिजित पाटील यांनीही पक्षाचा अद्याप तसा आदेश आलेला नाही. पक्षाचा आदेश आला व राष्ट्रवादीने विश्वासात घेतले तर महाविकास आघाडीतून निवडणूक लढविण्याबाबत विचार केला जाईल, असे सांगितले. तर काँग्रेसचे माजी नगरसेवक वैभव पवार यांनीही कोणासोबत जाण्याबाबत पक्षाचा आपल्याला काही आदेश नाही, असे सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news