सांगली ; पुढारी वृत्तसेवा
तीन वर्षांपूर्वी नागपूर येथे एका मनोरुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आष्टा (ता. वाळवा) येथील पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद यांच्याविरुद्ध नागपूरमधील सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तेथील गुन्हे अन्वेषणचे उपअधीक्षक सुरेंद्र धुमाळे यांनी फिर्याद दिली आहे.
सिद यांच्यासह आणखी सहा पोलिसांविरुद्धही गुन्हा दाखल आहे. 2019 मध्ये सिद सक्करदरा पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक होते. 16 सप्टेंबर 2019 रोजी ताजबाग परिसरात फैजान अहमद नसीब अली (वय 36) हा फिरत होता. त्याला जमावाने मारहाण केली होती. अली हा रस्त्यावर जाणार्या लोकांवर दगडफेक करीत असल्याची तक्रार पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यामुळे सक्करदरा पोलिसांनी अली ताब्यात घेतले होते. तो मनोरुग्ण आहे, हे माहीत असूनही पोलिसांनी त्याला अमानुष वागणूक दिली. पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत त्याचे डोके जमिनीवर आदळल्याने तो जखमी झाला होता.
अलीला न्यायालयात नेले होते. पण जेवणाची सुट्टी झाल्याने त्याला पोलिस वाहनात बसविले होते. तिथेच त्याचा मृत्यू झाला. मानसिक आजार व शारीरिक जखमांवर उपचार न दिल्याने अलीचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सिद यांच्यासह सहा जाणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाची चौकशी केली.
सिद यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याविरुद्धचा अहवाल आल्यानंतर खातेनिहाय चौकशी करून सिद यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी सांगितले.