सांगली : आणखी दोन महिने ढगफुटी, अतिवृष्टीचा धोका; गळीत हंगाम लांबणार

सांगली : आणखी दोन महिने ढगफुटी, अतिवृष्टीचा धोका; गळीत हंगाम लांबणार
Published on
Updated on

सांगली; मोहन यादव :  वातावरणातील अस्थिरतेमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पुढील दोन ते तीन महिने म्हणजे डिसेंबरपर्यंत ठिकठिकाणी ढगफुटीसद़ृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीसह मोठी गारपीट होण्याचा धोका आहे. तसेच विजा कोसळण्याचे प्रमाणही वाढणार आहे.

मागील काही वषार्ंपासून तीनही हंगामाच्या वेळापत्रकात काहीसा बदल होत आहे. पावसाळा लांबताना दिसत आहे. हिवाळा व उन्हाळ्याचा कालावधी काहीसा कमी होत आहे. पण हिवाळ्यातील थंडी व उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता वाढत आहे. सांगली जिल्ह्यात मागील हिवाळ्यातील तापमान 14 ते 11 अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले होते. तर उन्हाळ्यात पारा 38 ते 41 पर्यंत वाढला होता. तसेच पावसाळा जुलैमध्ये सुरू होऊन डिसेंबरपर्यंत कायम होता. ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली होती. याचा मोठा फटका शेतीला बसला होता.

यंदाही गतवर्षीपेक्षा बिकट परिस्थिती उद्भवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञाकडून व्यक्त केली जात आहे. यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून भारतासह विविध देशात ढगफुटींच्या घटना सतत होत आहेत. मागील आठवड्यात बेंगलोर, मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भ तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. तसेच सध्या पश्चिम महाराष्ट्रात व सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी पडत असलेल्या जोरदार पावसामुळे हवामान तज्ज्ञांनी सप्टेंबरमध्ये सांगितलेल्या सर्व शक्यता खर्‍या ठरत आहेत.

या अंदाजानुसारच पावसाळा डिसेंबरपर्यंत लांबण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात आक्टोंबर, नाव्हेंबर, डिसेंबर असे पुढील तीन महिने अतिवृष्टी होण्याचे संकेत दिले जात आहेत. अगदी जानेवारीतही पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय मागील काही वर्षापेक्षा महाराष्ट्रात गेल्यावर्षी (2021 मध्ये) विजा पडण्याचे प्रमाण 35 टक्क्यांनी वाढले आहे. यात यंदा आणखी वाढ होईल. यातून पश्चिम महाराष्ट्रही सुटणार नाही. यामुळे जीवित हानी होण्याचा धोका संभवतो आहे.

तसेच मोठ्या आकारांच्या गारा पडण्याचे प्रमाण वाढून काही ठिकाणी मोठ्या थेंबांची अतिवृष्टी होईल. मोठ्या आकाराच्या थेंबांच्या प्रचंड मार्‍यामुळे पिके भुईसपाट होण्याचा धोका आहे. तसेच सध्या कृष्णा खोर्‍यातील बहुतांश धरणे भरली आहेत. त्यामुळे योग्य नियोजन न केल्यास पडणार्‍या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागेल. तसेच ढगफुटीच्या प्रचंड पावसामुळे काही ठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी रस्ते, जमिनी वाहून जाण्याबरोबर खचण्याची शक्यता आहे. याबरोबरच सततच्या पावसामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही ऊस गळीत हंगाम अडकण्याची भीती आहे. शेतकरी, तोडणी मजूर, साखर कारखानदार यांचे हाल होणार आहेत. द्राक्ष व डाळिंब बागांसह अन्य पिकांनाही मोठा फटका बसून कोट्यवधी रुपयांच्या हानीची शक्यता आहे.

मान्सूनचा पॅटर्न बदलतोय : प्रा. डॉ. जोहरे

याबाबत हवामान तज्ज्ञ प्रा. डॉ. किरणकुमार जोहरे म्हणाले, गेल्या काही वषार्ंपासून मान्सून पॅटर्न बदलत आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण दिसून आले. यंदा जून, जुलैपासून सुरू झालेला पाऊस हा मान्सूनपूर्व आहे. सूर्यावरील चुंबकीय वादळामुळे तो झाला. यामुळे पावसाळा पुढील दोन-तीन महिने लांबणार आहे. यातूनच वातावरणात अस्थिरता तयार होत आहे. परिणामी क्युम्युलोनिंबस (क्युम्युलो म्हणजे बाष्प असलेले अजस्त्र त्रिकोणी ढग व निंबस म्हणजे पाणी असलेले ढग) तयार होत आहेत. या ढगांचे भोवरे निर्माण होऊन ढगफुटी होत आहे. सध्या वातावरणात अशा प्रकारचे ढग तयार होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पाकिस्तान, चीन, जर्मनी, स्पेनमध्ये हे प्रमाण मोठे आहे. पाकिस्तानात तर हाहा:कार उडाला आहे. महाराष्ट्रातही हे प्रमाण वाढत आहे. राज्यासाठी पुढील दोन-तीन महिने धोक्याचे आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हेही यातून सुटणार नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news