

सांगली : पुढारी वृत्तसेवा
येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या शंभर मीटर परिसरात दि. 2 एप्रिलपर्यंत संचारबंदी आदेश लागू केला आहे. या परिसरात आता कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच महापालिकेकडून परिसरात पत्रे मारून तटबंदी करण्यात आली आहे.
भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी कार्यक्रम होणारच, असा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी संचारबंदीचा आदेश जारी केला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी स्मारकाच्या सभोवताली 100 मीटर परिसरात दि. 2 एप्रिल रोजी 10 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. स्मारक परिसरात लोकांनी विनाकारण जमण्यास, गटागटाने फिरण्यावर मनाई केली आहे. घोषणा देणे, फलक लावण्यास, सभा घेणे शस्त्र घेऊन प्रवेश करण्यास, मंडप घालण्यास मनाई केली आहे.