सांगली; पुढारी वृत्तसेवा : अनिकेत कोथळे खून प्रकरणातील तपास अधिकारी व तत्कालीन जिल्हा पोलिस उपाधीक्षक धीरज पाटील यांचा उलट तपास आज अपूर्ण राहिला. सरकार पक्षाच्यावतीने त्यांची फेरसाक्ष घेण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे आजची सुनावणी तहकूब ठेवण्यात आली. पुढील सुनावणी दि. 26 सप्टेंबररोजी होणार आहे.
सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व त्यांना सहायक म्हणून जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. बचाव पक्षातर्फे अॅड. गिरीष तपकिरे, अॅड. प्रमोद सुतार, अॅड. विकास पाटील यांनी काम पाहिले. सीआयडीचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी व विद्यमान उपअधीक्षक आयेशा लांडगे सरकार पक्षाला मदत करीत आहेत. अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या समोर सुरू आहे. सोमवारी धीरज पाटील यांची मुख्य साक्ष झाली. बचाव पक्षातर्फे त्यांचा उलट तपास घेण्यात आला. हवालदार अनिल लाड यांच्या चौकशीतून खुनाचा उलगडा झाला असल्याची साक्ष धीरज पाटील यांनी दिली होती.
धीरज पाटील यांची मुख्य साक्ष खोटी ठरवण्याचा प्रयत्न बचाव पक्षाने केला. धीरज पाटील यांची फेरसाक्ष घेण्याची विनंती सायंकाळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाकडे केली. त्यामुळे आजची सुनावणी तहकूब ठेवून पुढील सुनावणी 26 सप्टेंबररोजी घेण्याची सूचना न्यायालयाने केली.