

देवराष्ट्रे : विठ्ठल भोसले : जिल्ह्यात तब्बल 824 अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही. शासन स्मार्ट अंगणवाडी संकल्पनाही राबवित आहे, पण या अंगणवाड्यांना स्वत:चे छत नाही, याकडे लक्ष नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
जिल्ह्यात जवळपास 2 हजार 930 अंगणवाड्या मंजूर आहेत. तासगाव तालुक्यात सर्वाधिक 296 अंगणवाड्या तर सांगली शहरामध्ये सर्वात कमी म्हणजे 152 अंगणवाड्या आहेत. कवठेमहांकाळ – 291, मिरज – 234, खानापूर – 231, जत – 236, वाळवा 1 – 208, वाळवा 2 – 183, पलूस – 168, शिराळा – 262, आटपाडी – 243, कडेगाव – 223, उमदी – 189 अशा अंगणवाड्या मंजूर आहेत.
मात्र, एकूण 2 हजार 930 पैकी 2 हजार 242 अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती आहेत. उर्वरीतपैकी प्राथमिक शाळांच्या खोल्यांत 198 अंगणवाड्या, ग्रामपंचायत इमारतीमध्ये 70, समाजमंदिरात 52, खासगी जागा अथवा देवळात 368 तर भाड्यांच्या इमारतीमध्ये 336 अंगणवाड्या भरत आहेत.
अंगणवाडीमध्ये मुलांच्या शिक्षणाचा पाया घडविला जातो. अंगणवाडीत मुलांची गुणवत्ता वाढावी यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. दर्जेदार भौतिक सुविधा देेत आहे. मध्यंतरी शासनाने देखील 14 व्या, 15 व्या वित्त आयोगातून अंगणवाड्यांना विविध साहित्यांचा पुरवठा केला आहे.
सव्वीस अंगणवाडी इमारतींचे निर्लेखन
मुदतबाह्य अथवा पुरामुळे खराब झाल्यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील 13, मिरज तालुक्यातील 4, खानापूर तालुक्यातील 3, शिराळा तालुक्यातील 3 तर कडेगाव, सांगली व उमदी येथील प्रत्येकी एका अंगणवाडीचे निर्लेखन करण्यात आले आहे.