सांगली : पुढारी वृत्तसेवा
मिरज येथील कत्तलखान्याचा ठेका काढून घ्या, कत्तलखान्याचे कामकाज आलबेल असल्याचे सांगणारे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांना निलंबनाची नोटीस द्या, स्मार्ट एलईडी बसवण्याचे काम अपेक्षेप्रमाणे सुरू नसल्याने 'समुद्रा'ला काळ्या यादीत टाकण्याची नोटीस द्या, विद्युत विभाग प्रमुख तथा सहायक आयुक्त अशोक कुंभार यांनाही नोटीस द्या, असे आदेश महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत देण्यात आले.
महापालिकेत शुक्रवारी स्थायी समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी सभापती निरंजन आवटी होते. नगरसेवक संतोष पाटील यांनी मिरज कत्तलखान्याचा प्रश्न उपस्थित केला. कत्तलखाना नियमाप्रमाणे चालवला जात नाही. ठेकेदाराने दररोज 450 भाकड जनावरांच्या कत्तलीचा परवाना घेतला आहे. प्रत्यक्षात एक-दोन जनावरांचीच कत्तल होते.
बाकीच्या जनावरांच्या कत्तली रस्त्यावर किंवा घरात होत असण्याची मोठी शक्यता आहे. आरोग्य तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ठेकेदाराचा ठेका काढून घ्या. नवीन ठेकेदाार नियुक्तीपर्यंत जुन्या ठेकेदाराकडून कत्तलीचे काम करून घ्यावे, अशी मागणी पाटील यांनी केली. तसा ठराव करण्यात आला.
स्मार्ट एलईडी प्रकल्पाचे काम अटी-शर्थीप्रमाणे होत नसल्याने त्यांना काळ्या यादीत का टाकू नये, अशी नोटीस 'समुद्रा'ला बजावली जाणार आहे. बैठकीत ठरल्यानुसार कार्यवाहीकडे दुर्लक्ष करत असल्याने सहाय्यक आयुक्त कुंभार यांनाही कारणे दाखवा नोटीसा बजावण्याचे आदेश दिल्याची माहिती आवटी यांनी दिली.
कृष्णा नदीतील पाणीपातळी कमी झाल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुषित पाणी प्यावे लागत आहे. ठेकेदार ब्लिचिंग पावडर देत नसेल तर सेकंट लोएस्ट ठेकेदाराकडून ब्लिचिंग पावडर घ्या, अशी मागणी संतोष पाटील यांनी केली. वारणा उद्भव योजनेंतर्गत वारणा नदीतून पाणी उपसा करून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी 'एमजेपी'ला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासनाने कार्यवाही केली नाही. पुढील महासभेपूर्वी हा प्रस्ताव एमजेपीला पाठवावा, असे आदेश स्थायी समिती सभेने दिले.
प्रस्तावीत कुपवाड ड्रेनेज योजनेचा 'एसटीपी' सांगली-धामणीच्या सीमेवर प्रस्तावीत केलेला आहे. संबंधित नाला खुला न करता 'एसटीपी' केले तर दहा एमएलडी पाण्याने वानलेसवाडी पाण्यात जाईल, अशी भिती संतोष पाटील यांनी व्यक्त केली. कुंभार मळा ते धामणी ते कृष्णा नदीपर्यंतचा मुजवलेला नैसर्गिक नाला खुला करावा. भारत सुतगिरणी चौक ते होळकर चौकापर्यतचा नाला मुजवला आहे. त्यामुळे चैत्रबेनचा नाला तुडूंब भरून वाहील. त्यामुळ हे नालेही मोकळे करणे गरजेचे आहेत. दरम्यान त्याअनुषंगाने अहवाल सादर करण्याचे आदेश आवटी यांनी दिले.
3.50 कोटी रुपये भरूनही..! पाणी पुरवठा विभागाकडील पंपहाऊसला अखंडीत वीज पुरवठा व्हावा यासाठी महापालिकेने महावितरणकडे 3.50 कोटींची अनामत भरली आहे. तरिही वीज पुरवठा खंडी होत असल्यावरून सर्वंकष माहिती, पर्यायी व्यवस्थेबाबत स्थायी समितीने अहवाल मागवला आहे.
सभापती निरंजन आवटी तसेच स्थायी समिती सदस्य संतोष पाटील, जगन्नाथ ठोकळे, फिरोज पठाण, संजय यमगर यांनी नुकतेच मिरज येथील कत्तलखान्याला भेट दिली. या भेटीची माहिती देताना आवटी म्हणाले, कत्तलखान्याचा सावळा गोंधळ निदर्शनास आला.
स्थायी समितीने कत्तलखान्याला भेट दिली तेव्हा एकाच जनावराची कत्तल होत असल्याचे समोर आले. महापालिकेच्या परवान्याचा वापर संबंधित ठेकेदार मटण 'एक्सपोर्ट'साठी करतो असे निदर्शनास आले आहे. आरोग्य अधिकार्यांनी सहा महिन्यात कत्तलखान्याला भेटही दिली नाही. तरीही सर्व काही आलबेल असल्याचे डॉ. आंबोळे सांगतात. डॉ. आंबोळे यांचा अक्षम्य दुर्लक्षपणा कारणीभूत आहे. ठेकेदाराचा ठेका तात्काळ रद्द करुन नवीन निविदा मागवण्याचे व आरोग्य अधिकारी आंबोळे यांच्यावर शिस्तभंग कारवाईचे तसेच निलंबनाची नोटीसही दिली जाणार असल्याचे आवटी यांनी सांगितले.