इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा
वेगवेगळ्या जाती, धर्म आणि संप्रदायातील लोकांनी एकत्र येऊन भारतीय संविधानाची आखणी केली. त्यातूनच भारतीयत्व या संकल्पनेला आकार मिळाला. संविधानाने आपणाला समानतेचा अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. मात्र अमर्याद सत्तेचा गैरवापर करून आज या स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे. अस्मितांचा वापर करून भावनांना आवाहन करणारे द्वेषाचे राजकारण केले जात आहे. संविधानविरोधी शक्तींचा हा वाढता हस्तक्षेप रोखायचा असेल, तर तरुणांनी डोळसपणे संविधान समजून घ्यायला हवे, असे प्रतिपादन ‘निर्भय बनो’ चळवळीतील कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी केले.
येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘संविधानाच्या पानांमध्ये दडलंय काय?’ या विषयावर ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष अॅड. एन. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. जनरल सेक्रेटरी सरोज पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील उपस्थित होते.
अॅड. सरोदे म्हणाले, आज महापुरुषांचे अनुयायी कमालीचे भावनिक झाले आहेत. विचार सोडून व्यक्तिस्तोम वाढत निघाले आहे. व्यक्तीऐवजी विचारांवर प्रेम करायला हवे. अॅड. बी. एस. पाटील, दिलीप पाटील, कॉ. धनाजी गुरव, प्रा. एल. डी. पाटील, रावसाहेब पाटील, शिवाजी मोरे, अशोक पाटील, सतीश पाटील, सुभाष ढगे उपस्थित होते. प्र. प्राचार्य डॉ. नितीन शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एकनाथ पाटील यांनी परिचय करून दिला. उपप्राचार्य डॉ. पी. व्ही. गायकवाड यांनी आभार मानले. डॉ. प्रकाश आठवले, प्रा. अजित पाटील, प्रा. एच. बी. वसावे यांनी संयोजन केले. डॉ. राजेश दांडगे यांनी सूत्रसंचालन केले.