विटा : विट्यात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात विटा पोलिसांना यश आले. याप्रकरणी संशयित विश्वास हणमंत गुजर आणि पूजा विश्वास गुजर (दोघेही रा. सातारा) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, येथील सराफ पेठेतील आरती ज्वेलर्सच्या काऊंटरच्या ड्रॉव्हरमधील 3 लाख रुपयांची रोकड लंपास झाल्याची फिर्याद यावर्षी जानेवारी महिन्यात दाखल झाली होती. या चोरीच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास सूचना दिल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण पथकामधील हवालदार प्रमोद साखरपे, महेश संकपाळ आणि अक्षय जगदाळे यांना, सातारा येथील चोरट्यांनी हा डल्ला मारल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार आज, सोमवारी पोलिसांनी संशयित विश्वास हणमंत गुजर आणि पूजा विश्वास गुजर, (दोघेही रा. सातारा) यांना सातारा येथून सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशयितांना पोलिस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली. यावेळी त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम एक लाख 55 हजार रुपये आणि चोरीच्या रकमेतून खरेदी केलेली 90 हजार रुपये किमतीची चारचाकी (क्र. एमएच 04 डीजे 2219), तसेच 70 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 3 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.