

मिरज; पुढारी वृत्तसेवा : कुंटणखान्यात अल्पवयीन मुलीस विक्रीप्रकरणी संबंधित मुलीच्या मालकीणीची बहीण मुन्नी ऊर्फ जनत्तुल फिरदोस चमिली महंमद अल्ताफ हुसेन ऊर्फ मुन्नी शेख ऊर्फ मुन्नी इस्माईल जमादार हिचा बोगस जन्मदाखला बनविणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये अब्दुलकादर उर्फ तौफिक गुलमहंमद मुजावर (वय 37) आणि मुजम्मिल महमंद सिराज मुल्ला (वय 36, दोघे रा. मिरज) यांचा समावेश आहे.
सांगली येथील गोकुळनगरमधील कुंटणखान्यात बांग्लादेशमधील एका अल्पवयीन मुलीच्या विक्रीचा प्रकार घडला होता. संबंधित मुलीस बांग्लादेशमधून पश्चिम बंगालमार्गे आणून तिला ठाणेमध्ये नेण्यात आले होते. तेथे तिचा बोगस जन्म दाखल तयार करून गोकुळनगरमध्ये विक्रीसाठी आणल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणला मिळाली होती. त्यानुसार पथकाने संबंधित अल्पवयीन मुलीची मालकीन अफसाना उर्फ कामिनी उमरफारूक शेख (वय 35, रा. मुंबई), तिची बहीण मुन्नी (रा. सांगली), मुन्नीचा साथीदार ईस्माईल सिकंदर जमादार (वय 23, रा. इचलकरंजी, ता. हातकणंगले) या तिघांना यापूर्वीच अटक केली होती.
दरम्यान, अफसाना व मुन्नी या दोघी देखील बांगलादेशी आहेत. परंतु मुन्नी ही सध्या गोकुळनगरमध्ये वास्तव्यास आहे. तिचा सांगलीमधील बोगस जन्मदाखल तयार करण्यात आला होता. याचा तपास पोलिस करीत होते. पोलिस तपासात मिरजेत ट्रॅव्हल एजंट म्हणून काम करणारे तौफीक आणि मुजम्मिल या दोघांनी महापालिकेतील एका कर्मचार्याच्या मदतीने मुन्नी हिचा बोगस जन्म दाखला तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे; परंतु याबाबत माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली.