महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार

महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार
Published on
Updated on

सांगली : पुढारी वृत्तसेवा
कृष्णा नदीच्या महापुराला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध पथके नियुक्त केली आहेत. विभाग व अधिकारीनिहाय जबाबदारी निश्‍चित केली आहे. आपत्ती व्यवस्थापनाची सर्व साधने सज्ज आहेत. पूरपरिस्थिती उद्भवल्यास मदत, सुटका आणि पुनवर्सन यात महानगरपालिका सर्वोत्तम कामगिरी करेल, असा विश्‍वास आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्यक्त केला.

सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नागरी क्षेत्रांसाठी प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र सांगली महानगरपालिकेच्या 'मंगलधाम' या प्रशासकीय इमारतीत कार्यरत आहे. या केंद्रातून सांगलीतील पूरपट्ट्यावर सीसीटीव्हीच्या मदतीने 'वॉच' आहे. पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने तातडीने मदतीचे नियोजन केलेले आहे, अशी माहिती कापडणीस यांनी दिली.

सन 2019 व 2021 मधील कृष्णा नदीला आलेला अत्युच्च महापूर लक्षात घेत संभाव्य पुराला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. पावसाळा पूर्व तयारी, पावसाळा कालावधीतील तयारी व पावसाळ्यानंतरची तयारी असे तीन भाग केले आहेत. त्यानुसार उपाययोजना व विभागनिहाय जबाबदार्‍या निश्‍चित केल्या आहेत.

सन 2022 च्या पावसाळा कालावधीत उद्भवणार्‍या कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिका प्रशासन व सर्व यंत्रणा सज्ज आहेत. यावर्षीही मदत, सुटका, पुनवर्सन यात महापालिका सर्वोत्तम कामगिरी नोंदवेल. महापालिकास्तरीय आणि प्रभाग समितीस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. प्रभागस्तरीय आपत्ती प्रतिसाद पथके नियुक्त केली आहेत. या पथकांची संख्या 20 आहे. प्रत्येक पथकात समन्वय अधिकारी, नगरसेवक, सहायक कर्मचारी, प्रभागातील आपत्ती मित्र, प्रभागातील स्वयंसेवक यांचा समावेश आहे.

 सहा नियंत्रण कक्ष, 36 निवारा केंद्र

सहा नियंत्रण केंद्रे, 36 निवारा केंद्रेही निश्‍चित केली आहेत. महापालिका शाळा व खासगी शाळा, महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे. मदत स्वीकृती व वितरण केंद्र चार निश्‍चित केली आहेत. सहायक आयुक्त हे या केंद्राचे संपर्क प्रमुख आहेत. सर्पमित्र 24, बोटिंग क्‍लब 4, पट्टीच्या पोहणार्‍या 44 व्यक्ती तसेच सेवाभावी संस्थांचे नाव, संपर्क क्रमांक याची यादी तयार करण्यात आली आहे. आपत्तीच्या वेळी त्यांची तातडीने मदत घेता यावी याअनुषंगाने सज्जता झालेली आहे.

महापूर : आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी.. एक दृष्टीक्षेप

सन 2005 मधील महापुराची सर्वोच्च पाणी पातळी 53 फूट 9 इंच
सन 2019 मधील महापुराची सर्वोच्च पाणी पातळी 57 फूट 6 इंच
सन 2021 मधील महापुराची सर्वोच्च पाणी पातळी 54 फूट 10 इंच
धोका पातळी 45 फूट

आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध साधने

सुसज्ज फायर टेंडर (वाहन) : 6,
अत्याधुनिक रेस्क्यु व्हॅन : 1
पस्तीस फूट उंचीच्या शिड्या- 8 फायर बोटी- मोठ्या 6, लहान 2
रबर बोटी : 3 (चालू 1, नादुरुस्त 2) ओबीएम मशीन : 10 चालू
पेट्रोल चेन सॉ : 10 बी. ए. सेट : 5 लाईफ जॅकेट : 900
लाईफ रिंग : 17 हेल्मेट 30, गमबूट 52 रिफ्लेक्टर जॅकेट : 40
अ‍ॅस्का लॅम्प : 2 फायर सूट : 4 बॉडी कवर बॅग : 10
पूर प्रसारण नियंत्रण प्रणाली : 2

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news