

सांगली : पुढारी वृत्तसेवा
पूर्वीच्या तुलनेत आधुनिक युगात केवळ मेडिकल आणि इंजिनिअरिंग याच्या मागे न धावता विविध प्रकारच्या संधी उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखून या संधीरुपी आव्हान स्वीकारून त्यावर स्वार व्हा, असे आवाहन संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अरूण पाटील यांनी केले.
दै. पुढारी एज्युदिशा या शैक्षणिक प्रदर्शनात 'उच्च शिक्षणाचे महत्त्व आव्हाने आणि संधी' या विषयावर डॉ. पाटील यांचे व्याख्यान झाले.
ते म्हणाले, इंग्रजीबद्दल न्यूनगंड मनात अजिबात बाळगू नका. आमच्या काळात इंग्रजी बोलणारे फार कोणी नव्हते. मार्गदर्शन देखील फारसे कोणी करत नव्हते. मात्र आता आपल्या भोवती भरपूर संधी आहेत. मार्गदर्शन आणि माहिती मिळत आहे. हे ज्ञानाचे भांडार सहजासहजी उपलब्ध होत आहे. विविध चांगल्या शिक्षण देणार्या संस्था आपल्या परिसरात आहेत. आपल्यात कोणती क्षमता आहे हे ओळखून घ्या. काय करायचे आहे ते आत्ताच ठरवा.
पूर्वी संधी कमी होती, आता भरपूर संधी उपलब्ध होत आहेत. पूर्वीच्याकाळी इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे दोनच ट्रेंड सर्वांना माहीत होते. आपला मित्र जातो, शेजारी जातो, आई- वडील सांगतात म्हणून कोणतेही क्षेत्र निवडू नका. आपल्यातील आवड, क्षमता ओळखून त्यानुसार निवड करा.
डॉ. पाटील म्हणाले, मुलांना आता संधी माहीत होत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांच्या निर्णयात ढवळाढवळ करू नये. त्यांना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्याची माहिती करून द्या. मात्र काय करायचे आहे ते त्यांना ठरवू द्या.