देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने : पृथ्वीराज चव्हाण

देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने : पृथ्वीराज चव्हाण

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सध्याची राजकीय परिस्थिती, केंद्र शासनाकडून होत असलेला शासकीय यंत्रणेचा गैरवापर, न्यायालयाचे अचंबित करणारे निर्णय, भाजप नेत्यांची भडकाऊ भाषणे व धमकी सत्र, या सर्व गोष्टीवरून देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने चालली असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगली येथे पत्रकारांशी बोलताना केली.

पृथ्वीराज चव्हाण सांगली दौर्‍यावर आले होते. पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, सध्याच्या राजकीय सत्ता संघर्षाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज निर्णय होणे अपेक्षित होते. परंतु न्यायालयाने आजची सुनावणी पुन्हा उद्या ठेवली आहे.

आमदारांच्या निलंबनाच्या कार्यवाहीबाबतचा निर्णय बाकी असताना मुख्यमंत्र्यांना शपथ देणे हेच आश्चर्यकारक आहे. दरम्यानच्या काळात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झाली आहे. आता काही वेगळा निर्णय लागला तर सर्वोच्च न्यायालय घड्याळ उलटे फिरवणार आहे का? त्यामुळे न्यायालयाचे नेमके काय चालले आहे, ते आम्हाला कळत नाही. न्यायदेवतेने कायद्याची योग्य अंमलबजावणी केली पाहिजे. परंतु तसे झालेले दिसत नाही.

उद्या जेंव्हा न्यायालयातील घटनापीठ स्थापन होईल. त्यावेळी सर्व बाबींचा विचार करून योग्य निर्णय होईल, असे वाटते. त्यानंतर महाराष्ट्रात परिस्थिती स्थिरस्थावर होईल. तसेच महाराष्ट्रात असा घोडेबाजार पुन्हा चालणार नाही. जो घोडेबाजार झाला आहे, त्याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार आहे.

चव्हाण पुढे म्हणाले, केंद्रातील सरकारने आत्तापर्यंत साडेपाच हजार लोकांविरोधात ईडीमार्फत कारवाई केली. त्याचा निकाल काय लागला? विरोधी पक्षात असणार्‍या व्यक्तींवर ईडीची कारवाई चालते. तोच माणूस जर भाजपमध्ये गेल्यानंतर त्याच्या संस्था, तो माणूस धुतल्या तांदळासारखा होतो. पक्षपातीपणाने सध्या राजकारण सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीवरून संविधान धोक्यात असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या त्या वक्तव्यावरून दिसून येते. भाजपाला शिवसेनेसह सर्व राजकीय पक्ष संपवायचे असल्याचे नड्डा यांनी जाहीर सभेत मत व्यक्त केले आहे.

उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा निषेधार्ह आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडेल, अशी परिस्थिती निर्माण करणे अत्यंत चुकीचे आहे. या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. कोणालाही भाषण करण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे.

पाचशे पन्नास ठिकाणी कारवाई; निकाल काय?

केंद्र शासन ईडी सारख्या शासकीय यंत्रणेचा वापर विरोधी पक्षाच्या नेत्यांची राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी करत आहे. आत्तापर्यंत 5500 ठिकाणी कारवाई केल्या. परंतु त्याचा काय निकाल लागला ते आपल्याला दिसते आहे. फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यावरच कारवाई केली जात असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news