जत : गुन्हेगारीने वाढली चिंता; आठवड्यात दिवसा तीन खून  

file photo
file photo
Published on
Updated on

जत; विजय रुपनूर : तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. एका आठवड्यात भरदिवसा तीन खून झाले आहेत. खून, मारामार्‍या, दरोडे, चोर्‍या, खासगी सावकारकी, बनावट सोने विक्री, बनावट कागदपत्रे, दाखले तयार करणे, अ‍ॅट्रॉसिटी, शासकीय कामात अडथळा, मृत्यूस कारणीभूतचे गुन्हे, फसवणुकीचे गुन्हे, खुनी हल्ले आदी घटनांचे प्रमाण वाढत आहे. तालुक्यात दि. 11 मार्च रोजी कोसारी येथे जमिनीच्या वादातून दोघांचा खून, माजी नगरसेवक विजय ताड यांची 17 मार्च रोजी गोळ्या झाडून केलेली हत्या व यासह अन्य घटनेमुळे जतमध्ये दहशतीचे वातावरण दिसून येत आहे.

तसेच या घटनेने पोलिसांचा गुन्हेगारी जगतावर वचक राहिला नाही व त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कौटुंबिक वाद, कलह, घटस्फोट, विनयभंग, बलात्कार, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, छेडछाड, रोडरोमिओची दहशत, सासरच्या कुटुंबीयांना कंटाळून विवाहितेंच्या आत्महत्या, हुंडाबळी, बालविवाह या घटना सातत्याने घडत आहेत. जत शहरात दि. 24 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दोन महाविद्यालयीन तरुणी पोलिस भरतीचा सराव करत असताना त्यांची दोन तरुणांनी काढलेली छेडछाड, जाब विचारताच संबंधितांना मारहाण, 10 मार्च रोजी दिवसा अल्पवयीन मुलीची तिघा तरुणांनी छेडछाड काढल्याने पीडित मुलगी रस्त्यावर बेशुद्ध पडली, अशा घटनांमुळे सामाजिक अशांतता वाढली आहे. परिणामी महिला व शाळकरी मुलींचा सुरक्षेेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक घटनेचा तपास प्रलंबित आहे. परिणामी गुन्हेगारांना अभय मिळत आहे. विशेष करून महिलांच्या बाबतीत घडणार्‍या गुन्ह्यांची वाढ झाली आहे. निर्भया पथक जतमध्ये आहे का नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.

अवैध धंद्यांची मालिका सुरूच आहे. शहरात मटका बुकींची साखळीच निर्माण झाली आहे. खुलेआमपणे जुगार, मटका, तीन पत्ते पाने खेळ सुरूच आहे. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. मंगळवार बाजारपेठेतून मोटारसायकली चोरीस जाण्याचा सर्रास प्रकार होत आहेत. शहरातील काही सीसीटीव्ही बंद अवस्थेत आहेत. व्यापारी व दलाल यांनी बिळूर, साळमळगेवाडी, डफळापूर येथील शेतकर्‍यांची द्राक्षे, डाळिंबे खरेदी घेऊन सुमारे चाळीस लाखाचा गंडा शेतकर्‍यांना घातला आहे. परराज्य व स्थानिक व्यापारी मोकाटपणे फिरत आहेत.

जत तालुक्यात सीमावर्ती भागात गांजा तस्करांच्या टोळ्याच तयार झाल्या आहेत. अनेक तरुणवर्ग गांजा, अप्पू , चरस यांच्या आहारी जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news