वारणावती; पुढारी वृत्तसेवा : चांदोली येथे वन्यजीव विभागाच्या ताब्यात तस्करीतून जप्त केलेला कोट्यवधींचा नरक्या वाहनामध्ये ठेवला होता. शनिवारी दुपारी अचानक या ठिकाणी लागलेल्या आगीत वाहने आणि कोट्यवधीचा नरक्या जळून खाक झाला. ही आग लागली की लावली गेली याबाबत उलट सुलट चर्चा परिसरात सुरू आहे.
सन 2004 च्या सुमारास चांदोली राष्ट्रीय उद्यानातून नरक्याची तस्करी होत असल्याचे उघड झाले होते. त्यावेळी वनविभागाने तस्करांवर कारवाई करून कोट्यवधींचा नरक्या व वाहने जप्त केली होती. त्यावेळी तत्कालीन अधिकार्यांनाही निलंबित केले होते. तेव्हापासून जप्त केलेली वाहने आणि नरक्या वनस्पती येथील गोडावूनमध्ये ठेवण्यात आले होते. संबंधित तस्कर, वाहन चालक, मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे जप्त केलेला नरक्या येथील वन्यजीव कार्यालयाच्या ताब्यात होता.
गेल्या वीस वर्षांपासून तो एकाच जागी पोत्यात भरून ठेवण्यात आल्यामुळे कुजला होता. न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे वन्यजीव विभागाने येथे कर्मचारी नेमून कोट्यवधींचा नरक्या संरक्षित केला होता.
शनिवारी दुपारी अचानक याठिकाणी आग लागली. याबाबतची माहिती वन्य विभागाला मिळाल्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न केला. यातील दोन वाहनांना जेसीबीच्या सहाय्याने आगीपासून वाचवण्यात वन्यजीव कर्मचार्यांना यश आले. मात्र कडक, ऊन त्यातच वाळलेला नरक्या यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे आग आटोक्यात आली नाही. अग्निशमन विभागाला कळवूनही तब्बल तीन तास झाले तरी यंत्रणा घटनास्थळी पोहोचू शकली नाही. त्यामुळे संरक्षित केलेला संपूर्ण नरक्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यात कोट्यवधी रुपयांचा नरक्या तसेच जवळच असणारे दोन ट्रक जळून खाक झाले.
शनिवारी दुपारी चांदोली वन्यजीव विभागात आग लागली. परंतु या ठिकाणी प्रमुख अधिकारी कोणीही नव्हते. सकाळीच सागरेश्वर अभयारण्यातील चितळ चांदोली अभयारण्यात सोडण्यासाठी म्हणून चांदोलीचे वनक्षेत्रपाल हे वरिष्ठ अधिकार्यांसोबत सागरेश्वर येथे गेले होते. त्यामुळे या घटनेत नेमके किती नुकसान झाले हे समजू शकले नाही. सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सविस्तर माहिती देऊ, असे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी सांगितले. तसेच ही आग कशी लागली याचा शोध घ्यावा यासाठी पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.