गॅम्बलिंग गेमिंगमध्ये होतो आर्थिक गेम

गॅम्बलिंग गेमिंगमध्ये होतो आर्थिक गेम
Published on
Updated on

सध्या तरुणाई ऑनलाईन गॅम्बलिंग गेमिंग, लोन अ‍ॅप्सच्या मोहजालात अडकत चालली आहे. या रॅकेटमध्ये अडकून अनेकांना मोठा आर्थिक गंडा बसू लागला आहे. फसवणुकीच्या तक्रारी वाढत आहेत, पण कोणताच पुरावा मिळत नसल्याने खेळणारे हतबल आहेत. हे रॅकेट परराज्यातून चालत असल्याने गुन्हेगारांचा ठावठिकाणा लागत नाही. यामुळे सायबर पोलिसही कारवाई करू शकत नाहीत. यावर राज्य सरकारने तातडीने बंदी घालण्याची गरज आहे.

जुन्या फंड्यातून अनेकांना गंडे

पूर्वीपासून मटका, तीनपानी, लॉटरी असे जुगाराचे अनेक प्रकार प्रसिध्द आहेत. सध्या याचे प्रमाण काहिसे कमी झाले तरी काही ठिकाणी हे प्रकार सुरुच आहेत. काळाच्या ओघात यात कसिनो, क्रिकेट बेटिंगची भर पडली. यानंतर दामदुप्पटीच्या अनेक पॉन्झी स्कीम आल्या. यात अनेकांचे हात पोळले.

अलीकडच्या चार-पाच वर्षांत शेअर बाजार, क्रिप्टोकरन्सीव्दारे शॉर्टकटने पैसे मिळविण्याचा नवीन फंडा सुरू झाला. अनेकांना लाखो रुपयांचा गंडा बसला. यातील फसवणूक लक्षात आल्याने लोक सावध झाले आहेत.

गेमिंग अ‍ॅप्सचे मोहजाल

लोकांना गंडविण्यासाठी गुन्हेगार अनेक शक्कल लढवित आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. सेक्सटॉर्शन, हनी ट्रॅपचे रॅकेट तर सर्वश्रुत आहे. आता गुन्हेगारांची मजल यापुढे गेली आहे. सध्याच्या युवकांचा जास्तीत- जास्त वेळ मोबाईल आणि सोशल मीडियावर जात आहे, याचाच गैरफायदा काहीजण घेत आहेत. युवकांना मोहजालात अडकविण्यासाठी नवनवीन मोबाईल गेमिंग अ‍ॅप्स विकसित केली आहेत. हे ऑनलाईन गॅम्बलिंग गेमिंग, लोन अ‍ॅप्सचे मोहजाल तरुणाईवर फेकले जात आहे. यात अनेकजण अडकत चालले आहेत.

….खेळा आणि पैसे जिंका

या गेमिंगमध्ये खेळा आणि पैसे जिंका, अशा प्रकारचे संदेश किंवा लिंक मोबाईलवर येतात. कॅश गेम, जंगली, सर्कल, पॅलेस अशा अनेक प्रकारांचा यात समावेश आहे. या अ‍ॅप्सचा प्रचार अभिनेते, क्रिकेटपटूव्दारे केला जातो. यातून काही दिवसांतच लाखोंची कमाई होऊ शकते, असे युवकांना भासविले जाते.

पॉईंटस मिळवत चालल्याने यातून सुरुवातीला काही प्रमाणात कमाईही होते. पण नंतर हे व्यसन जडते. यामुळे युवक दिवस-रात्र, काळ-वेळ न पाहता पैसे लावून खेळण्यात दंग राहतात. हळूहळू रक्कम वाढत गेल्यानंतर मात्र जिंकण्याचे प्रमाण कमी आणि हरण्याचे प्रमाण जादा होते.

गेम्स पूर्णतः संगणकीकृत

या सर्व गेम्स पूर्णतः संगणकीकृत आहेत. दहा गेम खेळल्यानंतर दोन ते तीन वेळाच जिंकले जावे, अशाच पध्दतीने त्या विकसित केल्या आहेत. तसेच जिंकण्याच्या वेळेस इंटरनेट नेटवर्कची रेंज कमी केली जाते. बँकेतून पैसे कट झाले तरी गेम वॉलेटमध्ये तेे जमा होत नाहीत. इंटरनेट सर्व्हरडाऊन या कारणाने सुद्धा पैसे बुडविले जातात. जिंकलेले पैसे बँक खात्यात देण्यासाठी अनेकवेळा केवायसी केली तरी काहीतरी तांत्रिक कारणे सांगून रक्कम देण्यास टाळाटाळ केली जाते. काहीवेळा डेव्हलपरकडून गेम आयडी परस्पर ब्लॉक केला जातो. यातून फसवणूक झाल्याच्या तक्रारी अलिकडे वाढत आहेत. इतर राज्यात यावर बंदी आहे;पण महाराष्ट्रात हा प्रकार खुलेआमपणे सुरू आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल क्रिकेट हंगामात हा जुगार सर्रासपणे सुरू होता.

झटपट कर्ज नव्हे फसवणूक

लोन अ‍ॅप्सचेव्दारेही फसवणूक वाढली आहे. झटपट व कागदपत्राशिवाय कर्ज देण्याचे आमिष यात दाखविले जाते. मोबाईलवर अशा लिंक पाठविल्या जातात. यावर क्लिक केले की वेगवेगळ्या शक्कल लढवून ग्राहकांकडून बँक खात्याची सर्व माहिती घेतली जाते. सायबर तज्ज्ञ असणारे गुन्हेगार कार्ड हॅक करून पिन शोधून सावजाच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम लंपास करतात. पैसे गेल्यानंतरच ग्राहकांना हे फसवणुकीचे रॅकेट असल्याचे समजते. यातून अनेकांना मोठा गंडा बसल्याचे प्रकार दररोज समोर येत आहेत.

हा खेळ मोबाईलवर तासन्तास खेळला जातो. यामुळे अनेकांना मानदुखीचा त्रास सुरू झाला आहे. काहींच्या डोळ्यावरही परिणाम होतो. बोटांच्या संवेदना कमी होतात. मेंदूवर अतिरिक्त ताण येतो. यातून नेहमीच्या कामावर परिणाम व एकूणच कार्यक्षमेवर होतो. तसेच पैसे हरल्यानंतर अनेकांना नैराश्य येते. यातून तरुण दारूसह अन्य व्यसनाच्या आहारी जातात.
-डॉ. प्रदीप पाटील, मानसोपचार तज्ज्ञ, सांगली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news