खतांवरील ‘लिंकिंग’नेे दुकानदार मेटाकुटीला

खतांवरील ‘लिंकिंग’नेे दुकानदार मेटाकुटीला
Published on
Updated on

इस्लामपूर : सुनील माने

रासायनिक खत कंपन्यांकडून खत विक्रीमधील 'लिंकिंग' ही एक मोठी समस्याच बनली आहे. त्यामुळे खत दुकानदार पूर्णपणे भरडला जाऊ लागला आहे. लिंकिंगच्या नावाखाली दुकानदारांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. वाळवा व शिराळा तालुक्यात सुमारे 700 कृषी सेवा केंद्रे आहेत. कृषी सेवा केंद्र तसेच सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना रासायनिक खते तसेच बी-बियाण्यांचा पुरवठा केला जातो. काही कंपन्यांची रासायनिक खते खरेदी करीत असताना खत दुकानदारांना वाहतूक भाडे अदा करावे लागते.

त्यामुळे अशा कंपन्यांची खते ही रेल्वे स्टेशनपासून दुकानापर्यंत मिळावीत. पण ही खते पोहोच मिळत नाहीत. सांगलीपासून 40 किलोमीटर अंतरावर असणार्‍या दुकानदारांना खते पोहोच मिळतात आणि 40 किलोमीटरपेक्षा अंतर जादा भरले की, एमआरपीपेक्षा जादा दराने खते कंपन्या माथी मारत आहेत. एमआरपीपेक्षा जादा दराने शेतकर्‍यांना खत विक्री करता येत नाही. तसेच खत दुकानदारांना कंपन्याकडून मिळणारे मार्जिनही अत्यल्प असते. त्यामुळे खत दुकानदार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

कंपन्यांना रोख पेमेंट केल्याशिवाय दुकानदारांना खतांची डिलीव्हरी दिली जात नाही. त्यासाठी घ्यावे लागणारे बँकांचे कर्ज व त्या कर्जाचे व्याज भरावे लागते. वाढलेले रासायनिक खतांचे दर आणि शासनाच्या नियमानुसार करावे लागणारे कामकाज या सर्वांचा विचार करता सध्या खत दुकान चालविणे खूपच अडचणीचे झाले आहे. त्यातच खत कंपन्या खत दुकानदार पर्यायाने शेतकर्‍यांना आवश्यक असणारी लिंकिंगची खते न देता कंपन्यांकडे उपलब्ध असणारी लिंकिंगची खते देतात. सर्वच दुकानदारांच्या गोडाऊनमध्ये लिंकिंगची खते मोठ्या प्रमाणात शिल्‍लक पडली आहेत.

शेतकर्‍यांना लागणारी खते कमी आणि लिंकिंगची खते जादा अशी परिस्थिती गोडावूनमध्ये आहे. तरी दुकानदारांकडून शेतकर्‍यांना आवश्यक असणारीच लिंकिंगची खते मिळावीत, अशी मागणी वाळवा तालुका सीडस्-पेस्टीसीड्स अ‍ॅन्ड फर्टिलायझर्स असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.

सध्या खरीप तसेच नवीन लागण केलेल्या ऊस पिकास रासायनिक खतांचा डोस टाकण्याची बळीराजाची लगबग सुरू आहे. परंतु कंपन्यांकडून रासायनिक खतांचे होत असलेले लिंकिंग याचा भुर्दंड दुकानदार व शेतकर्‍यांच्यावर पडत आहे. या होणार्‍या गळचेपीविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कंपन्यांच्याविरोधातच आवाज उठवावा, अशी मागणी शेतकरी तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांच्यातून होत आहे.

सर्व शेतकरी संघटनांनी कंपन्यांविरोधात आवाज उठवावा…रासायनिक खत विक्रीमध्ये लिंकिंग ही समस्या मोठी बनली आहे. व्यापारी पूर्णपणे यामध्ये भरडला जाऊ लागला आहे. खते खरेदी केल्यानंतर कंपन्यांकडूनच लिंकिंगची खते दुकानदारांच्या माथी मारली जात आहेत. ही खते त्या-त्या सिझनला दिली तर त्याचा शेतकर्‍यांना फायदा होईल. स्वाभिमानी तसेच इतर संघटनांनी शेतकर्‍यांवर तसेच दुकानदारांवर कंपन्यांकडून होणारा त्रास थांबवावा. त्यांच्याविरोधात आवाज उठवावा.

– नानासाहेब औताडे, अध्यक्ष – वाळवा तालुका सीडस्-पेस्टीसीड्स असोसिएशन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news