कृष्णा, वारणेची पाणीपातळी स्थिर : धरण परिसरात जोरदार पाऊस; सांगली जिल्ह्यात उघडीप

सांगली : कृष्णा नदीचे तुडुंब भरलेले विस्तीर्ण पात्र आणि पुलावरून धावणारी रेल्वे. अंकली पुलावरून टिपलेले छायाचित्र! (छाया : सचिन सुतार)
सांगली : कृष्णा नदीचे तुडुंब भरलेले विस्तीर्ण पात्र आणि पुलावरून धावणारी रेल्वे. अंकली पुलावरून टिपलेले छायाचित्र! (छाया : सचिन सुतार)

सांगली; पुढारी वृत्तसेवा : धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा, वारणा नद्यांची वाढलेली पाणीपातळी स्थिर आहे. सायंकाळी पाण्याला काहीसा उतार लागला. जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे; पण धरण परिसरात मात्र जोरदार पाऊस सुरूच आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 3.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 27.4 मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी.मध्ये पुढीलप्रमाणे : मिरज -2.1 (298), जत -0.6 (267.8), खानापूर-विटा-0.6 (351.1), वाळवा-इस्लामपूर -4.3 (439.9), तासगाव -3.1 (296.7), शिराळा -13.5 (898.7), आटपाडी- 0.9 (216.3), कवठेमहांकाळ – 0.7 (382.9), पलूस – 1.9(261.1), कडेगाव -4.8 (352.3).
धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. कोयना धरण येथे गेल्या 24 तासांत 96, नवजा येथे 125, महाबळेश्‍वरला 179 मि.मी. पाऊस पडला. यामुळे कोयना धरणातून प्रतिसेंकद 11 हजार 372 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. चांदोली परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे या धरणातून प्रतिसेंकद 9 हजार 365 क्यूसेक विसर्ग सुरूच आहे. यामुळे कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी शुक्रवारपासून वाढले. शनिवारी पाणीपातळी काहीशी स्थिर होती. सांगलीत पाणीपातळी 29.5 फूट होती. अलमट्टी धरणातून 2 लाख 25 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील दोन्ही नद्यांचे पाणी कमी होऊ लागले आहे.

चांदोली धरणात 31.38 टीएमसी पाणीसाठा आहे. कोयना धरण 91.42 (105.25 टीएमसी भरले आहे), धोम 12.29 (13.50), कण्हेर 9 (10.10), धोम बलकवडी 3.38 (4.08), उरमोडी 8.99 (9.97), तारळी 5.23 (5.85), अलमट्टी 104.52 (123).

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news