

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात होणार्या दिरंगाईबाबत निषेध करणारे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे वाळवा तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. सदरचे निवेदन तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून 2013 ला पुण्यात झाला. या घटनेला यावर्षी नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर प्रसिद्ध विचारवंत गोविंद पानसरे यांची कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली. आपण एका बाजूला पुरोगामी महाराष्ट्र राज्य म्हणतो तर दुसर्या बाजूला महाराष्ट्रात पुरोगामी विचारवंताचे खून होतात. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. यानंतर प्रा. कलबुर्गी आणि ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचे खून झाले. धार्मिक मूलतत्त्ववादी, सनातनी प्रवृत्तीच्या लोकांनी संघटितपणे हे खून केले असावेत, असे वाटते. म्हणूनच आम्ही अजूनही तपासात होत असलेली दिरंगाईबद्दल निराश आहोत.
या सर्व तपास यंत्रणेतील अक्षम्य दिरंगाईबद्दल राज्य व केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. खुनातील सहभाग असलेल्या सर्व संघटना आणि सूत्रधारांना तातडीने अटक करावी आणि त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी.
यावेळी महा. अंनिसचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, प्रा.बी. आर. जाधव, संध्या सपकाळ, जितेंद्र भिलवडीकर, ओंकार मंडले, निलेश नेर्लेकर आदी उपस्थित होते.