

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडीच्या शिवाजी आणि तानाजी या पाटील बंधूंच्या सावकारीने तालुक्यातील लोकांना मोठा त्रास झाला आहे. अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे या सावकारीचा शेवट केल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
खाजगी सावकारीमुळे आत्महत्या व विषारी औषध पिण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आटपाडी येथे निघालेल्या मोर्चानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी पंढरपूरचे माऊली हळदनकर, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, दादासाहेब मरगळे, अनिल पाटील, अशोक माळी, रुपेश पाटील, लक्ष्मण बालटे, विष्णू अर्जुन, अनिल सूर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते.
पडळकर म्हणाले काही दिवसांपूर्वी गळवेवाडीच्या अप्पा गळवे या शेतकऱ्याने सावकारीला कंटाळून आत्महत्या केली.या सावकारीमध्ये मध्यस्थी केलेल्या मच्छिंद्र धोंडिबा माळी यांना सावकाराने वेठीस धरल्यामुळे त्यांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पोलीस, डॉक्टर आणि वरिष्ठ नेत्यांना मॅनेज करून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. सावकारकीच्या चुकीच्या षड्यंत्राला राजाश्रय मिळाल्याने त्यांचे धाडस वाढले आहे. सर्वसामान्य जनतेवर मोठा अन्याय होत आहे. मच्छिंद्र माळी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी राजकीय दबावापोटी व तांत्रिक मुद्दा उपस्थित करत पोलीस तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.
यावेळी पडळकर म्हणाले पोलिसांवर दबाव आहे. जयंत पाटील यांचे हस्तक असलेले सरकारी वकील अरविंद देशमुख यांचे म्हणणे ऐकून पुढील कारवाई करू, असे पोलीस सांगतात. जयंत पाटील यांच्या सांगण्यावरून माझ्यावर तक्रार होते.पण या सावकारांवर गुन्हा का दाखल होत नाही हे समजत नाही.
शाहिस्तेखान व अफझलखानची अवलाद असलेल्या पाटील बंधूंच्या सावकारीने लोकांना घरे दारे गमावून,भूमिहीन व्हावे लागले आहे.अनेकांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे या सावकारीचा शेवट केल्याशिवाय मी थांबणार नाही असा इशारा आमदार पडळकर यांनी दिला.
माऊली हळदनकर म्हणाले अनेक अडचणी आल्या तरी मी सोलापूर जिल्ह्यातील अनेक सावकारांना तडीपार केले आहे.अन्यायाविरुद्ध लढायची उर्मी ठेऊन राजकीय दबावाला बळी न पडता सावकारीचा नांगी ठेचा.अशोक माळी यांनी सावकारांच्या मुळे होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला. मच्छिंद्र माळी औषध पिल्यानंतर सुदैवाने बचावले. सावकारी बद्दल आवाज उठवल्याने माझ्याही जीवाला ही धोका होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली.
दरम्यान शेरेवाडी येथील अण्णा शंकर कुपेकर, सम्राट देशमुख, चंद्रकांत मेटकरी, तुळसाबाई वीरकर, रंजन देशमुख, बाबासो जगदाळे, दिलीप मंडले यांनी सावकाराच्या जाचाबद्दल तक्रारी केल्या. पोलीस सावकार यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी हर्षवर्धन देशमुख, अनिल पाटील आदींची भाषणे झाली.
सभेपूर्वी आटपाडी बस्थानका पासून मुख्य पेठेतून खाजगी सावकारी मोडून काढा,सावकाराच्यावर गुन्हे दाखल करा,अशा घोषणा देत पोलीस ठाण्यावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला. सभेपुर्वी आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सावकारी संदर्भात दखल झालेल्या तक्रारी आणि जबाब पाहून कारवाई करू पुरावे आणि तपास करून सावकारांवर गुन्हे दाखल केले जातील.
जिल्हा बँकेच्या निवडणुकी वेळी पडळकर आणि पाटील बंधूंच्या राडा झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चानंतर पडळकर यांच्यासह लोकांनी रस्त्यावरच ठिय्या आटपाडी-दिघंची महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती.