आघाडी सरकारकडून मिरजेवर अन्याय

आघाडी सरकारकडून मिरजेवर अन्याय

मिरज : पुढारी वृत्तसेवा

पूर्वीच्या काँग्रेस आघाडी सरकारने अडीच वर्षात एकही रुपयांचा निधी मिरजेसाठी दिला नाही. त्या सरकारने निधी देण्याबाबत मिरजेवर अन्याय केला. आता युती सरकार आले आहे. त्यामुळे पुढच्या काळात निधीचा बॅकलॉग भरून निघेल. या सरकारने मिरजेतील रस्त्यांसाठी त्वरित पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती आमदार सुरेश खाडे यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली.

आ. खाडे म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी भाजप आणि शिवसेनेने युती करून निवडणूक लढवली. मात्र शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन न करता दोन्ही काँग्रेसबरोबर आघाडी करून सत्ता स्थापन केली. या अडीच वर्षात आघाडी सरकारकडे मिरजेसाठी अनेक वेळा निधी मागितला. मात्र मिरजेला निधी देण्याबाबत आघाडी सरकारने अन्याय केला.

आता मात्र एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार आले आहे. त्यामुळे पुढील काळात मिरजेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवू. यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बक्षीस म्हणून मिरजेला 40 कोटी रुपये दिले होते. त्या निधीतून मिरजेत अनेक कामे सुरू आहेत. काही महिन्यात ही सर्व कामे पूर्ण होतील. गेल्या अडीच वर्षांमध्ये आघाडी सरकारने निधी न दिल्याने शहरातील काही कामे अपूर्ण राहिली होती. आता आमचे सरकार आले आहे. त्यामुळे निधी मिळवून ही प्रलंबित विकास कामे पूर्ण करू. आत्ता युती सरकारने मिरज मतदारसंघासाठी त्वरित पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही कामे महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत न करता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहेत.

आ. खाडे पुढे म्हणाले, मिरजेतील महात्मा गांधी पुतळा, बॉम्बे बेकरी, आळतेकर हॉल, दिंडी वेस, विजापूर वेस, वखार भाग ते शास्त्री चौक या रस्त्यासाठी दीड कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हॉटेल सुखनिवासपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते परमशेट्टी हॉस्पिटलपासून सांगली मिरज रोडपर्यंतच्या रस्त्यासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले आहेत. गाडवे पेट्रोल पंप ते बोलवाड रोड, महात्मा फुले चौक ते शास्त्री चौक, कमान वेस वाळू डेपो ते सांगलीकर मळा, गेस्ट हाऊस समोरील रमा उद्यानचा शंभर फुटी पर्यंतचा रस्ता, जुना मालगाव रोड ते इस्कॉन मंदिराकडे जाणारा रस्ता या पाच रस्त्यांसाठी अडीच कोटी असे एकूण पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news