अण्णा भाऊंना अभिवादनासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येणार वाटेगावात

अण्णा भाऊंना अभिवादनासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येणार वाटेगावात

सांगली; पुढारी वृत्तसेवा : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मभूमी असलेल्या वाळवा तालुक्यातील वाटेगावमध्ये जयंतीची जोरदार तयारी सुरू आहे. मंगळवार, 1 ऑगस्ट रोजी आयोजित अभिवादन सभेस व अण्णा भाऊंना अभिवादन करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उपस्थित राहणार आहेत.

मानव जनहित पक्षाचे नेते आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आजपर्यंत महाराष्ट्राचे एकही मुख्यमंत्री लोकशाहीर अण्णा भाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी वाटेगावला आले नाहीत; पण परराज्यातील एक मुख्यमंत्री मात्र वाटेगावला येतात, याचा विचार महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे.

अण्णा भाऊंनी विचारांची पताका जगभर फडकावली. परदेशातही त्यांचा पुतळा आहे; पण येथे जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे सांगलीत त्यांचे स्मारक नाही. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही दखल घेतली गेली नाही. इतकेच नाही, तर हरिपूर-कोथळी पुलास त्यांचे नाव द्यावे, या मागणीचाही गांभीर्याने विचार केला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

जयंती महोत्सव समितीच्यावतीने 1 ऑगस्ट अण्णा भाऊंच्या सून सावित्रीमाई साठे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन सभा आयोजिली आहे. भारत राष्ट्र समितीचे राज्य प्रमुख शंकर धोंगडे, भगीरथ भालके यांच्यासह आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सोनावणे अंकल व प्रा. शरद गायकवाड यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अभिवादन सभेपूर्वी सकाळी 10 वाजता राधा खुडे यांचा प्रबोधनात्मक संगीत कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वागताध्यक्ष गणेश भगत, आकाश तिवडे, शेवंता वाघमारे, अनिल जावीर, जनार्दन साठे, मोहन साठे, गणेश घोलप, राहुल घोंगडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शब्द पाळत नाहीत

एका बाजूला तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी वाटेगावात येतात; पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री म्हणून आपला शब्द पाळत नाहीत. मागील वर्षी स्मारकासाठी आणि विविध उपक्रमांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता; पण आजतागायत त्याबाबत निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सामाजिक न्याय खाते सांभाळता येत नसले तर त्यांनी ते दुसर्‍याकडे द्यावे. सांगली जिल्ह्यातीलच असणारे माजी अर्थमंत्री जयंत पाटील, सध्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही आजअखेर एक रुपयाही निधी दिला नाही, असा आरोेप साठे यांनी केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news