

सांगली : पुढारी वृत्तसेवा
महानगरपालिका तसेच जिल्ह्याला ईलेक्ट्रीक बसेस केव्हा मिळणार? ई-बस चार्जिंग स्टेशन जागांचा प्रश्न केव्हा सुटणार? शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्याला जमते, मग सांगली जिल्हाच पिछाडीवर का, असे प्रश्न नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी उपस्थित केले आहेत.
साखळकर म्हणाले, देशामध्ये सर्वत्र शासनाकडून इलेक्ट्रिक बस मिळत आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात आणि विशेषत: महानगरपालिका क्षेत्रासाठी एकही इलेक्ट्रिक बस मिळालेली नाही. प्रधानमंत्री ई-बस सेवा योजनेंतर्गत महापालिकेला केंद्र शासनाकडून 50 ई-बस मिळणार आहेत. मात्र ही ई-बस सेवा नेमकी केव्हापासून सुरू होणार, ई-बस सेवेसाठी पूर्वतयारी, याबाबत काहीच माहिती मिळत नाही. प्रशासनाकडून हालचालही दिसत नाही. महापालिका प्रशासनाने गतीने हालचाल करून महापालिका क्षेत्रात ई-बस सेवा तातडीने सुरू करावी.
माधवनगर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या जागेमध्ये चार्जिंग स्टेशन उभे राहू शकले नाही. म्हणून सांगली जिल्ह्यासाठी ई-बसेस उपलब्ध झाल्या नाहीत. महावितरण कंपनीला एसटीची माधवनगर येथील बारा गुंठे जागा लागणार आहे. त्याबाबत प्रशासकीय स्तरावर काहीच कार्यवाही झाली नाहीत. त्यामुळे ई-बस चार्जिंग स्टेशन उभारू शकले नाही. मात्र त्याचे सोयरसुतक कोणाला दिसत नाही.
कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला ई-बस आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातच मात्र राज्य परिवहन विभागाच्या जुन्या गाड्या धावताना दिसत आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ई-बस चार्जिंग स्टेशन उभारणीचा प्रश्न निकालात काढावा. शासनाकडून ई-बस मिळवाव्यात, अशी मागणी साखळकर यांनी केली. इस्लामपूर येथे चार्जिंग स्टेशन तयार झाल्याने तिथे लवकरच इलेक्ट्रिक बस मिळणार असल्याचे समजते, असेही त्यांनी सांगितले.