

Vita bus stand development Issue
विटा :विटा बसस्थानकाच्या दुरावस्थेबाबत लवकरच पालकमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढू, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे युवा नेते वैभव पाटील यांनी आज (दि.६) दिली .
विट्यातील बसस्थानकासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, या ठिकाणी १८ फलाटांचे आरसीसी बांधकाम, उपाहारगृह, दुकानगाळे, संरक्षित भिंत, प्रवेशद्वार आणि अंतर्गत भागाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी जुन्या इमारतीचे पाडकाम गेल्या वर्षी करण्यात आले. त्यामुळे सध्या प्रवाशांना, विशेषतः विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
या समस्येबाबत काही विद्यार्थ्यांनी थेट वैभव पाटील यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर आज पाटील यांनी बसस्थानकाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी अविनाश चोथे, भगवानराव पाटील, विनोद पाटील, प्रशांत सावंत, पृथ्वीराज पाटील, फिरोज तांबोळी, प्रताप सुतार, दहावीर शितोळे, सुभाष भिंगारदेवे, विशाल पाटील, आगार प्रमुख उदय पवार, वाहतूक निरीक्षक विनायक माळी, वाहतूक नियंत्रक रोहित गुरव आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, "बसस्थानक पाडल्यापासून परिसरात दुरवस्था आहे. संध्याकाळी सहानंतर स्वच्छतागृहे बंद असतात, फलाटांवर एसटी लागत नाही, त्यामुळे प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होते." विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून आपण स्वतः येथे भेट दिल्याचे त्यांनी सांगितले.
बांधकाम पूर्ण होण्याच्या मुद्यावर वाहतूक निरीक्षक विनायक माळी यांनी "सहा महिन्यात सर्व काही व्यवस्थित होईल," असे सांगितले. त्यावर पाटील यांनी "सहा महिन्यात काम पूर्ण होईल, असे लेखी द्यायला तयार आहात का?" असा प्रतिप्रश्न केला. यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मात्र, वैभव पाटील यांनी पुढाकार घेत सांगितले, "आम्ही सत्ताधारी आहोत. कामे पूर्ण होण्यासाठी गरज पडल्यास लोकप्रतिनिधींबरोबर बैठक घेऊ. तसेच लवकरच पालकमंत्र्यांना भेटून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू."