

Vita Nagar Parishad fund return Issue
विटा : राज्याच्या नगर विकास खात्याकडून विटा शहर आणि उपनगरातील सभा मंडपांसाठी मंजूर झालेला निधी वेळेत काम न झाल्याने परत गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. खानापूर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार अनिल बाबर यांनी सन २०२०-२१ मध्ये नगर विकास खात्याकडून वैशिष्ठ्यपूर्ण योजनेअंतर्गत विटा नगर पालिकेसाठी ४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता.
या निधीतून एकूण २४ कामे होणार होती. यात सभा मंडपही मंजूर होते. परंतु, वेळेत कामे झाली नाहीत. त्यामुळे निधी परत गेल्याची चर्चा सुरू आहे. यात विटा शहरातील नेहरूनगर येथील सभामंडप, शिवाजीनगर येथील सभा मंडप, तसेच सूर्यनगर येथील ५ सभा मंडपाच्या कामांचा समावेश आहे. विशेष म्हणजे २३ सप्टें बर २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी नगरविकास विभागाला लेखीपत्र देऊन सन २०२० -२१ या आर्थिक वर्षात वितरीत केलेल्या निधीस ३१ मार्च २०२४ पर्यंत दिलेली मुदत समाप्त होत आहे.
त्यामुळे शासन निर्णयानुसार मंजूर कामांना प्रशासकीय मान्यता देणे अडचणीचे होत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी मंजूर झालेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी स्थानिक प्रतिनिधी व रहिवाशांकडून होत आहे. तरी या कामाची निकड पहाता, या कामास दिनांक ३१ मार्च २०२५ अखेर पर्यत मुदतवाढ मिळावी, अशी विनंतीही केली होती. परंतु, अद्याप पर्यंत या कामांना मंजुरी अगर कसे याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र विटा शहरातील नेहरू नगर, शिवाजीनगर आणि सूर्यनगर येथील सभा मंडपांसाठी मंजूर झालेला निधी वेळेत काम न झाल्याने परत गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
ही वस्तुस्थिती आहे, की दोन वर्षांपूर्वी विट्यात सभागृह होण्याबाबत तत्कालीन आमदार अनिल बाबर यांनी बरेच प्रयत्न केले होते. मात्र त्या नंतर योग्य पाठपुरावा झालेला नाही. परिणामी निधी परत गेला. अनिल बाबर यांचे निधन होण्यापूर्वी आठवडाभर आधी जिल्हाधिकारी कक्षामध्ये बैठक झली होती. त्यावेळी संबंधित सभागृह उभारण्यासाठीची जागा ही नगरपालिकेची स्वतः ची पाहिजे, किंवा पालिके कडे हस्तांतरित झालेली पाहिजे, असे शासनाच्या जीआर मध्ये नमूद होते.
विट्यातील शिवाजीनगर, सूर्यनगर आणि नेहरूनगर येथे तशी जागा मिळाली नव्हती. त्यावर तत्कालीन आमदार अनिल बाबर यांनी मी स्वतः त्या- त्या उपनगरात जाऊन बैठक घेऊन समाजाकडे जागा मागणी करतो आणि तुम्हाला जागा देतो. पण सभागृह झालाच पाहिजे, असा आग्रह धरला होता. मात्र त्यानंतर त्यांच्या निधनानंतर हा विषय मागे पडत गेला, अशी माहिती विटा पालिकेचे बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील यांनी दिली.
ज्यावेळी शासनाचा निधी मंजूर झाल्याचे पत्र आले. त्यावेळी जागेचा मुद्दा पुढे आला होता. शिवाजीनगर, सूर्यनगर आणि नेहरूनगर येथे सभागृह उभा करण्यासाठी जागाच शासनाच्या मालकीची नाही, ही गोष्ट समोर आली. परिणा मी त्या वर्षातला त्या हेडचा निधी परत गेला. ते काम आमच्या विभागाकडेच आहे. अजूनही प्रयत्न केले. तर शासनाकडून मुदतवाढ मिळू शकते. मात्र जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी प्रतिक्रिया विटा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक स्थापत्य अभियंता संतोष तायडे यांनी दिली.