

कडेगाव शहर : कडेगाव हे तालुक्याचे ठिकाण असून दिवसेंदिवस या शहराची वेगाने वाढ होत आहे. शहरात नागरिकांची मोठी वर्दळ सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापारी वर्गही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु शहरात अद्याप अत्याधुनिक पद्धतीचे स्वतंत्र मटण मार्केट व भाजी मंडई नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. नगरपंचायतीने आधुनिक पद्धतीची भाजी मंडई उभारावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कडेगाव हे कराड-विटा मार्गावरील प्रमुख व्यापारी केंद्र असलेले शहर मानले जाते. पूर्वीपासूनच कडेगावची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. ब्रिटिश काळापासून येथे आठवड्याचा बाजार प्रत्येक शुक्रवारी होत असतो. आता तालुका झाल्यापासून आणि वाढत्या लोकसंखेचा विचार करता, कडेगावात सोमवारीही आठवडा बाजार सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता शहरात आठवड्यातून दोन बाजार भरतात. परंतु इतर दिवशी भाजीपाला विक्रीसाठी कायमस्वरूपी जागा नसलेने छत्रपती शिवाजी चौकात, बसस्थानक परिसर आणि मिळेल तिथे बसून शेतकरी आपला भाजीपाला विक्री करतात. त्यामुळे कायमस्वरूपी भाजी मंडई व्हावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
ताकारी, टेंभू योजनांमुळे मुबलक पाणी आलेने शेतकरी वर्ग आता मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याकडे वळला आहे. साहजिकच रोज सकाळी आणि संध्याकाळी दोनवेळा भाजीपाला विक्रीसाठी येथे खेड्यापाड्यातून शेतकरी येतात. सध्या शिवाजी चौक व बसस्थानक परिसरात भाजीपाला विक्रेते जागा मिळेल तेथे आपला भाजीपाला घेऊन बसताना दिसतात.