कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा
कवठेमहांकाळ येथील विठ्ठल (दाजी) पाटील दुय्यम बाजार आवार येथे भाजीपाला सौदा सुरू झाला. याला भागातील शेतकर्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. भाजीपाल्यास सौद्यात चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे. जत रोड येथील विठ्ठल (दाजी) पाटील बाजार समिती आवारामध्ये सुरू झालेल्या भाजीपाला सौद्यास तालुक्यातील शेतकर्यांबरोबरच मिरज, विटा, सांगोला, जत, तासगाव आणि कर्नाटकामधून शेतकरी दाखल होतात. यानिमित्ताने शेतकर्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
सौदा दररोज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होतो. यासाठी शेतकरी व व्यापारी यांची गर्दी होत आहे. बाजारामध्ये शेतकरी आपला भाजीपाला, मिरची, वांगी, कारली, टोमॅटो, पडवळ, दुधी भोपळा, गवारी, हुलगा, कोथिंबीर, ढबू मिरची, भेंडी, काकडी, सर्व प्रकारच्या भाज्या आणत आहेत. सौद्यात मंगळवारी भाजीपाल्यास मिळालेले दर पुढीलप्रमाणे : मिरची -30 ते 35 रु., वांगी - 25 ते 24 रु., कारली - 15ते 25 रु., टोमॅटो 8 ते 20 रु., गवारी- 40 ते 45 रु., कोथिंबीर -40 ते 45 रु., दुधी भोपळा-20ते 25रु., पडवळ-15 ते 20 रु.
दरम्यान, या ठिकाणी या आवारामध्ये भाजीपाला सौदा सुरू करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, सभापती महेश पवार, रामचंद्र पाटील, बाबासाहेब माळी, कुसुम कोळेकर, महेश चव्हाण, सोमलिंग चौधरी, व्यापारी विनोद सोनवणे, प्रमोद पाटील, बाळासाहेब कोरे, सुजित माळी, शिवाजी माळी, सुरेश पाटील, विक्रम ढोबळे, प्रशांत पवार, विष्णू चव्हाण, संदीप पाटील यांनी प्रयत्न केले.