

Brahmanand Padalkar on Vaibhav Patil
विटा: खानापूर तालुक्यातील भाजपच्या आगामी मेळाव्यासाठी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले जी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना निमंत्रण न दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि सांगली जिल्हा परिषदचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
भाजपच्या भाळवणी जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रम येत्या मंगळवारी, २२ जुलै रोजी आळसंद (ता. खानापूर) येथील श्री प्रभूराम मल्टीपर्पज हॉलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी ब्रह्मानंद पडळकर यांनी आज (दि.१९) पत्रकारांशी संवाद साधला.
पडळकर म्हणाले, "खानापूर विधानसभा मतदारसंघात भाजप संघटनवाढीचे काम जोमाने सुरू आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद वाढत आहे. काही वर्षांपूर्वी कार्यकर्ते शोधावे लागत होते, पण आता अनेक कार्यकर्ते आमच्यासोबत जोडले गेले आहेत. खानापूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायती आमच्या विचारांच्या आहेत."
ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सदाशिव खोत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक आणि ब्रह्मानंद पडळकर उपस्थित राहणार आहेत. या वेळी भाळवणी गटातील अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
कार्यक्रमासाठी वैभव पाटील यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याबाबत विचारले असता, ब्रह्मानंद पडळकर म्हणाले, "हा विषय वरिष्ठ पातळीवरील आहे. याबाबतचा निर्णय मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर वरिष्ठ नेते घेतील. तेच यावर भाष्य करतील." त्यांच्या या वक्तव्यामुळे तालुक्यात विविध चर्चा रंगल्या आहेत.
या पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष दाजी पवार, राहुल मंडले, निलेश पाटील, संग्राम माने, मयुरेश गुळवणी, प्रमोद भारते, सुशांत जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.