

आटपाडी : प्रतिकूल परिस्थितीत उज्वल यशाला गवसणी घालणाऱ्या आटपाडी तालुक्यातील मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण उत्तम कोळपे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) स्पर्धा परीक्षेत देशात ५८४ वी रँक मिळवली. या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद यशानिमित्त आटपाडी तालुक्याच्या वतीने प्रवीण यांचा गौरव करण्यासाठी शहरात हत्तीवरून भव्य आणि उत्साहपूर्ण मिरवणूक काढण्यात आली.
आटपाडी बसस्थानक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या मार्गावर हत्तीवर बसवून प्रवीण कोळपे यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये संपूर्ण शहरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. गावातील तरुण आणि नागरिक यांनी मोठ्या उत्साहात या मिरवणुकीत सहभाग घेतला.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः आटपाडी शहरात नागरिकांना साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. प्रवीण कोळपे यांच्या यशामुळे संपूर्ण आटपाडी तालुक्याचे नाव देशभरात उजळले असून त्यांच्या जिद्दीची सर्वत्र चर्चा होत आहे. या मिरवणुकीत माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, नगराध्यक्ष उत्तम जाधव, उपनगराध्यक्ष मीनाक्षी पाटील, भाजप तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले, भाजपचे नगरसेवक,नगरसेविका, कोळपे यांची आई, आजी आणि कुटुंबीय तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
आटपाडी तालुक्यातील जेमतेम हजार-बाराशे लोकसंख्या असलेल्या मिटकी या छोट्याशा गावातील प्रवीण उत्तम कोळपे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळवले आहे. २०२१ साली वडिलांचे निधन झाल्यानंतर घरची जबाबदारी वाढली. मात्र आईच्या कष्टांवर आणि स्वतःच्या जिद्दीवर विश्वास ठेवत त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर UPSC परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत आय.पी.एस. अधिकारी होण्याचा मान मिळवला. त्यांच्या या संघर्षमय प्रवासामुळे अनेक तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.
प्रवीणच्या यशाचा तालुक्याला अभिमानः आमदार गोपीचंद पडळकर
धनगर बहुल आटपाडी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, मेंढपाळ व्यवसायामुळे होणारी भटकंती यामुळे शिक्षणाकडे अनेकदा दुर्लक्ष झाले. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत मिटकीच्या प्रवीण कोळपे यांनी मिळवलेले यश अत्यंत अभिमानास्पद आहे. उपेक्षित समाजाची प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील हिस्सेदारी कमी आहे. राजकीय क्षेत्रात हिस्सेदारी मिळवण्यासाठी विविध समाज संघर्ष करत असताना दुसरीकडे तरुण पिढी प्रशासकीय सेवेत जाण्याचा प्रयत्न करत आहे. प्रवीण कोळपे हे आटपाडी तालुक्यातील पहिले आय.पी.एस. अधिकारी ठरले असून त्यांच्या या यशाचा संपूर्ण तालुक्याला अभिमान वाटत आहे.