

इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा : माणिकवाडी (ता. वाळवा) येथून ट्रॅक्टरचा चार फळी नांगर चोरून नेणार्या दोघा संशयितांना इस्लामपूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने अटक केली आहे. दोघांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
ऋषभ बापूसोा जाधव (वय 27, रा. आळसंद, ता. खानापूर), अक्षय मदन चौगुले (वय 27, रा. अंत्री बुद्रुक, ता. शिराळा) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून नांगर, गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर, असा 7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
माणिकवाडी येथील शंकर जाधव यांनी 15 मे रोजी ट्रॅक्टरचा चार फळी नांगर त्यांच्या शेतात लावला होता. दुसर्या दिवशी तेथे नांगर नव्हता. त्यांनी याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हे प्रगटीकरण पथकाला खबर्यांकडून चोरीला गेलेल्या नांगराची माहिती मिळाली.
पोलिस पथकाने संशयित ऋषभ, अक्षय यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर, नांगर, असा 7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, सहाय्यक पोलिस अधीक्षक राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल जाधव, पोलिस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील, सजन पाटील, गणेश शेळके, दीपक पाटील, प्रशांत देसाई, गणेश वाघ आदींनी ही कारवाई केली.