सांगली, पुढारी वृत्तसेवा : दैनिक पुढारी व कस्तुरी क्लबतर्फे आयोजित ‘शमा’ या दोनअंकी नाटकाला सांगलीकर रसिकांचा शनिवारी उदंड प्रतिसाद मिळाला. रसिकांनी नाट्यगृह तुडुंब भरले होते. संगीत, नृत्य आणि खिळवून ठेवणार्या कथानकाला रसिकांनी चांगलीच दाद दिली. राजदरबारातील शाही नर्तकीचा किताब पटकावणार्या नर्तकीच्या नशिबी आलेल्या दु:खाच्या कहाणीने रसिकांचे मन हेलावून गेले.
दैनिक पुढारी कस्तुरी क्लबच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त येथील विष्णुदास भावे नाट्य विद्यामंदिरात ‘शमा’ या बहुचर्चित दोनअंकी नाटकाचा प्रयोग झाला. महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोेडमिसे यांच्याहस्ते नटराजपूजन झाले. महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे, दैनिक पुढारीचे निवासी संपादक सुरेश गुदले प्रमुख उपस्थित होते. मिस कस्तुरी 2024 ची विजेती हर्षाली बेलवलकर, साक्षी गिड्डे, निलीमा ओरा, काजल सव्वाशे, वृंदा लिमये, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे व कस्तुरी क्लब सभासदांच्याहस्ते केक कापून कस्तुरी क्लबचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा केला. गजराज ज्वेलर्सतर्फे उपस्थित पाच महिलांना लकी ड्रॉद्वारे गिफ्ट हँपर देण्यात आले.
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर, क्रेडाई महाराष्ट्राचे सहसचिव रवींद्र खिलारे, सांगली क्रेडाईचे माजी अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, द सिल्युएट डिझाईन स्टुडिओच्या श्वेता दस्सानी, सलोनी ब्युटी केअरच्या संध्या काळे, नवराई ब्युटी केअरच्या पूनम अदिवैध, गजराज ज्वेलर्सचे संचालक मयूर पाटील उपस्थित होते. आपलं एफएम रेडिओ स्टेशन हेड रत्ना पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
दैनिक पुढारी व कस्तुरी क्लबतर्फे आयोजित मिस आणि मिसेस कस्तुरी 2024 या सौंदर्य स्पर्धेत ‘शमा’ नाटकाचा प्रभावी टिझर सादर झाला होता. त्यामुळे या नाटकाविषयी रसिकांमध्ये मोठी उत्सुकता होती. नाटक पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. शाही नर्तकीचा मान मिळूनही गुलामीचे जीवन जगावे लागणार असल्याचे समजताच जातीवंत कलाकाराची होणारी घुसमट नाटकातून दाखवली आहे. हैवानियत आणि इन्सानियत यातील फरक अधोरेखित करण्याचा प्रयत्नही नाटकातून प्रभावीपणे केला आहे. शमा आणि तरन्नुम या दोन नर्तकींमधील खटकेबाज जुगलबंदीला रसिकांनी चांगलीच दाद दिली. ‘खजुरी’ची अदाकारी भाव खाऊन गेली.
या नाटकाचे दिग्दर्शन विनोद आवळे यांनी अतिशय प्रभावीपणे केले आहे. ‘शमा’ या नर्तकीची मध्यवर्ती भूमिका रत्नेशा पोतदार यांनी मोठ्या नजाकतीने साकारली. शुभांगी चव्हाण यांनी ‘आपाजान’ची वजनदार भूमिका निभावली आहे. सोमनाथ पवार या कलाकाराने निभावलेला ‘खानसाब’, फतेहच्या भूमिकेतील कुणाल मसाले, जावेदच्या भूमिकेतील अनिकेत पाटील, दिनेश कांबळे यांनी साकारलेला पानवाला, प्रवीण कुंभार यांनी साकारलेला ‘वजीर’ यांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिला. तरन्नुमच्या भूमिकेतील हर्षाली बेलवलकर, ‘नूर’ ही भूमिका साकारलेली सलोनी लोखंडे, ‘कनीज’ हे पात्र साकारलेली शिल्पा पाठक, ‘खुशबू’च्या भूमिकेतील संस्कृती मोहिरे, ‘चांद’च्या भूमिकेतील सेजल शहा यांनी चांगली भूमिका निभावली.